देवरूखच्या आरोग्यसेवेला नवी उभारी
ग्रामीण रुग्णालय आता ५० खाटांचे होणार ; शासनाची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः तालुक्यातील देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील शासननिर्णय जारी केला. त्यामुळे देवरूखसह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवरूख हे संगमेश्वर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे ३० खाटांचे रुग्णालय अपुरे पडत होते. गंभीर आजार, अपघात आणि तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना रत्नागिरीसह दूरच्या शहरांत जावे लागत होते. त्यामुळे रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. आरोग्यसेवा संचालनालयाने सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार करून राज्यशासनाने या श्रेणीवर्धनास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार असून, तालुक्यातील आरोग्यसुविधांना बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
शासननिर्णयानुसार, ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी नियमानुसार नवीन जागेचे संपादन किंवा अधिग्रहण करण्यात येणार आहे तसेच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन इमारत उभारण्याचे नियोजन आहे. रुग्णालयाच्या कामकाजासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नवीन पदे निर्माण करण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्यात येणार आहे.
---
स्थानिक पातळीवरच अद्ययावत उपचार
या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील शेकडो गावांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. अपघात विभाग, बालरोग, स्त्रीरोग, शस्त्रक्रियांसारख्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा आता देवरूखमध्येच स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. यामुळे रुग्णांचा वेळ आणि ऐनवेळी होणारी आर्थिक पायपीट टळणार असून, देवरूखवासियांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.