Marathi News Live Update : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रात्री दीपोत्सव सजला. पणत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात मनकर्णिका कुंडाचे सौंदर्य आणखीनच खुलले. परिसरातील दीपमाळा पाजळल्यानंतर पारंपरिक उत्साहात पालखी सोहळा सजला. त्यानंतर नयनरम्य आतषबाजीही झाली.
दरम्यान, त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री अंबाबाईची ‘त्रिपुरारी शिव’ या रूपात सालंकृत पूजा बांधली. त्रिपुरारी पौर्णिमा आणि मंगळवार हा योग जुळून आल्याने पालखी सोहळ्याला गर्दी झाली.
पहाटे पंचगंगा घाटावर ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव सजला. हा लोकोत्सव अनुभवल्यानंतर सायंकाळनंतर विविध ठिकाणी दीपोत्सव झाला. अंबाबाई मंदिरासह राजाराम बंधाऱ्यावर दीपसंध्या सजली. त्याशिवाय रंकाळा, कोटीतीर्थ आदी ठिकाणी काहींनी दीप प्रज्वलित केले. कात्यायनी मंदिरात मैत्री हायकर्सतर्फे यंदाही दीपोत्सव साजरा झाला. दरम्यान, दीपोत्सवाच्या सोहळ्याने दिवाळीच्या आनंदपर्वाची सांगता झाली.