rat११p७.JPG-
६९१६२
दापोली ः हर्णै किनाऱ्यावरील मच्छीमारी नौका.
rat११p८.JPG-
६९१६३
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा.
-----------
सकाळ विशेष - लोगो
इंट्रो
कोकणाला लाभलेल्या ६४० किलोमीटर किनारपट्टीवर साडेचार लाख टन मत्स्योत्पादनाची क्षमता आहे. परंतु, गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचे परिणाम मत्स्योत्पादनावर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र त्यावर संशोधन करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. सद्यस्थिती पाहता कोकणासाठी स्वतंत्र ‘कोकण मत्स्य व्यवसाय विद्यापीठ’ स्थापन करणे काळाची गरज आहे. परंतु, राजकीय उदासीनता आणि प्रशासकीय लालफितीमुळे गेल्या १५ वर्षांपासून हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. याकडे गांभिर्याने पाहणे अत्यावश्यक आहे.
- मकरंद पटवर्धन, रत्नागिरी
--------
कोकणाला हवे स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ
राजकीय इच्छाशक्तीची गरज ; समुद्र कोकणात अन् विद्यापीठ नागपुरात
69260
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून कोट्यवधी रुपयांचा मुख्य सागरी मत्स्यव्यवसाय कोकणात चालतो. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात ४ लाख ६३ हजार ७५८ मेट्रिक टन सागरी मत्स्यउत्पादन झाले. यामध्ये कोकण किनारपट्टीचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ७१ हजार ३०३ मेट्रीक टन उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३,३९६ टनांनी वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पादन २३ हजार ४४५ मेट्रीक टन आहे. ठाण्याचे २८ हजार मेट्रीक टन, पालघर दीड हजार मेट्रीक टन तर पालघर जिल्ह्याच्या उत्पादनात दीड हजार टनांची भर पडली आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे ३८ हजार ते ४२ हजार मेट्रीक टन उत्पादन होते. महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन २०२३-२४ मधील ४ लाख ३४ हजार टनांवरून वाढून २०२४-२५ मध्ये ४ लाख ६३ लाख मेट्रिक टन झाले. २९ हजार १८४ टनांची वाढ झाली. हवामान बदल, प्रदूषण आणि परराज्यातील बोटींची घुसखोरी यांमुळे मध्यंतरी उत्पादनात काहीशी घट झाली होती. परंतु नवीन आकडेवारीनुसार उत्पादनात पुन्हा सुधारणा पाहायला मिळत आहे. कोकण किनारपट्टीवरून कोळंबी आणि बांगडा यांसारख्या माशांची मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीयस्तरावर निर्यात केली जाते.
प्रस्तावाला बजेटचा फटका
समुद्र कोकणात आणि विद्यापीठ नागपूरात अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. मुख्य विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरीतील मत्स्य शास्त्र महाविद्यालयाला किंवा कोकणातील प्रकल्पांना बळ देण्यासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाची गरज आहे. तसे झाले तर पुरेसा निधी यासह सोयी-सुविधाही मिळू शकतात. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी कोकणातील सात जिल्ह्यांसाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर या प्रस्तावात बदल करून तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र फिशरीज युनिव्हर्सिटी असा करण्यात आला. विद्यापीठाचा विस्तार संपूर्ण राज्यासाठी केल्यामुळे त्याचे अंदाजपत्रक थेट ५०० कोटी रुपयांच्या घरात गेले. आर्थिकदृष्ट्या हा प्रस्ताव अवाढव्य झाल्याचे कारण पुढे करीत वित्त व प्रशासकीय विभागाकडून त्याला मंजुरी दिली गेली नाही. परिणामी, मूळ कोकणासाठी आवश्यक असलेला हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला.
मत्स्यविषयक शिक्षण व संशोधनात माघार
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील उर्वरित भागासाठी नागपूर येथील ‘महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ’ कार्यरत आहे. परंतु, सागरी मत्स्य व्यवसायाची खरी ताकद कोकणात आहे. कोकण किनारपट्टीवर वर्षाला साडेचार लाख टन मत्स्यउत्पादन होते, मात्र संपूर्ण कोकणात सध्या रत्नागिरी येथे एकच मत्स्य महाविद्यालय आहे. याउलट, ज्या भागात अवघे २ लाख टनही उत्पादन होत नाही, तिथे नागपूर, उदगीर आणि अमरावतीतील दर्यापूर येथे महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. कोकणात सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे-पालघर या जिल्ह्यांमध्ये मत्स्य महाविद्यालयांचा बॅकलॉग गेल्या १५ ते २० वर्षांपासून कायम आहे.
प्रस्तावित विद्यापीठाचे स्वरूप कसे असेल?
कोकण मत्स्य विद्यापीठाच्या मूळ संकल्पनेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे किंवा पालघर अशा चार महाविद्यालयांचा त्यात समावेश असला पाहिजे. सध्या वांद्रे (मुंबई), पनवेल, रत्नागिरी (सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र) आणि मुर्बे येथे चार संशोधन केंद्र सुरू आहेत. कुठल्याही क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. १९७२ च्या दुष्काळानंतर कृषी विद्यापीठांची स्थापना झाली, ज्यामुळे देशात अन्नधान्याचे मुबलक उत्पादन शक्य झाले. त्याच धर्तीवर, मच्छीमार समुदायातील मुलांना उच्च शिक्षण मिळणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ थेट समुद्रात उतरणाऱ्या मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणात हे स्वतंत्र विद्यापीठ होणे अत्यंत गरजेचे आहे.
स्वतंत्र विद्यापिठामुळे हे साध्य होईल?
मुंबई, पनवेल, मूळधे, रत्नागिरी, नागपूर आणि उदगीर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालये व संशोधन केंद्रे एकत्र करुन कोकणात स्वतंत्र मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ झाल्यास नवीन अभ्यासक्रम, संशोधन होऊन पूर्ण क्षमतेने मत्स्यव्यवसाय वाढीला लागून रोजगाराच्या संधी वाढतील आणि मत्स्य विज्ञानाची एक शैक्षणिक संस्कृती कोकणात उदयाला येईल. मत्स्य निर्यातीमध्ये केरळ प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईसह सात सागरी जिल्ह्यात ४५६ मासेमारी करणारी गावे आहेत. कोकण किनारपट्टीवरील माशांची विविधता आपण लक्षात घेतली पाहिजे. कोकण कृषी विद्यापीठाने कृषी, फलोत्पादन, वन, कुरण विकास व मत्स्य विज्ञान विकास प्रादेशिक स्तरावर वैशिष्ठ्यपूर्ण परंतु एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन समितीने याच संकल्पनेवर आधारीत कृषी पदवीचा पुरस्कार केला आहे. समुद्रविज्ञान तंत्रज्ञान आणि पाण्याखालील तंत्रज्ञान या संबंधाने स्वतंत्र विद्यापिठ होण्याची गरज आहे.
वाढते शहरीकरण, तिवरांच्या बेटांचा नाश, माशांच्या प्रजोत्पादन काळातील मच्छीमारी, प्रदूषण, तसेच लहरी निसर्ग यामुळे आधीच मच्छीमार पुरता कात्रीत सापडला आहे. अशावेळी यांत्रिकी बोटीची क्षमता वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाने खोल पाण्यातील मच्छीमारी वाढवावी लागेल. अति मासेमारी जागतिक समस्या आहे. २०३० पर्यंत दोन कोटी टन मत्स्योत्पादनाचा टप्पा गाठायचा झाल्यास समुद्र, खाड्यातील मत्स्यशेतीशिवाय अन्य पर्याय नाही. मासे हा कच्चा माल म्हणून न विकता मुल्यवर्धित मत्स्यपदार्थ बाजारपेठेत आले तर मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट होईल. मत्स्यविद्यापिठात सर्व प्रकारचे तांत्रिक व अद्ययावत शिक्षण मिळाल्यास रोजगार क्षमता वाढवून निर्यातीत भर पडेल.
कोट १
कोकणातील मत्स्यसंपत्ती विदेशातील लोकांना आकर्षित करीत आहे. केवळ गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी विदर्भात नागपूर व उदगीरमध्ये मत्स्य महाविद्यालये आहेत. ती कमी पडतात म्हणून की काय अमरावतीच्या धरण क्षेत्रात तिसरे मत्स्यविद्यालय प्रस्तावित आहे. याउलट लांबलचक ७२० कि.मी. किनारपट्टी व ७० खाड्यांसाठी केवळ रत्नागिरीचे एकच मत्स्य महाविद्यालय ते देखील नागपूरला जोडले आहे. महाराष्ट्रात वाढलेले मत्स्योत्पादन, मत्स्यव्यवसायाला मिळालेला कृषीचा दर्जा, मिरकरवाडा बंदराजवळील हटवलेली ३०० अतिक्रमणे आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर ही मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांची उपलब्धी आहे. कोकण किनारपट्टीवर राणे यांनी मत्स्य व समुद्रविज्ञान सुरू करण्याचा आग्रह धरावा, अशी तमाम कोकणवासियांची रास्त अपेक्षा आहे.
- विलास पाटणे, अभ्यासक, रत्नागिरी
कोट २
कोकणात खाडी आणि समुद्रकिनारे लाभलेले आहेत. किनारपट्टीवरील छोट्यात छोटा माणूसही एखादी गळ किंवा हुक घेऊन बसला, तर दिवसाला हजार-बाराशे रुपये सहज कमावू शकतो. भविष्यात मत्स्य व्यवसाय करताना केवळ पारंपरिक पद्धतीने चालवणे कठीण होऊ शकते. जर किनारपट्टीवरील तरुणांनी शास्त्रीय शिक्षण घेऊन हे विद्यापीठ पूर्ण केले, तर ते नक्कीच फायदेशीर ठरेल. सध्या वातावरणात होत असलेले बदल पाहता, त्यावर संशोधन झाले तर त्याचा फायदाही मत्स्य संपदा टिकवून ठेवता येईल.
- अनिरूद्ध साळवी, जयगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.