रत्नागिरीत दस्त नोंदणीचा उच्चांक
दोन वर्षांत ६१ कोटींहून अधिक महसूल; चार वर्षांत २४४ विवाह नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : रत्नागिरी तालुक्यामध्ये दस्त नोंदणी आणि विवाह नोंदणीविषयक कामकाजाला गेल्या काही वर्षांत मोठा वेग आला आहे. गेल्या दोन वर्षांच्या अवधीत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तब्बल १६ हजार १४० दस्तांची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून शासनाला तब्बल ६१ कोटी २५ लाख ५८ हजार २०० रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय, विशेष विवाह नोंदणीअंतर्गत मागील चार वर्षांत २४४ विवाह नोंदणीची नोंद झाली असून, त्यातून कार्यालयाला ३६ हजार ६०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यावरून नागरिकांचा मालमत्ता दस्त नोंदणी तसेच इतर प्रशासकीय कामांकडे वाढलेला कल स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी हा कोकणातील वेगाने विकसित होणारा व आर्थिक उलाढालींचे प्रमुख केंद्र असलेला तालुका आहे. येथे गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर मिळकत खरेदी-विक्री, भाडेपट्टा (लीज) आणि कर्जप्रकरणांसाठीचे गहाण दस्त मोठ्या संख्येने नोंदवले गेले. या दोन वर्षांतील विविध प्रकारच्या १६ हजार १४० दस्त नोंदणीतून कार्यालयाला थेट ६१ कोटींहून अधिकचा घसघशीत निधी मिळाला आहे. शहरासह ग्रामीण भागातही जमिनीचे व्यवहार आणि दस्त नोंदणीची गती कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली.
सहदुय्यम निबंधक वर्ग २ तथा विवाह अधिकारी कार्यालयामार्फत सामान्य विवाह नोंदणीसह ‘विशेष विवाह कायद्यान्वये’ विवाह संपन्न केले जातात. गेल्या चार वर्षांमध्ये या कार्यालयात एकूण २४४ विशेष विवाह नोंदवले गेले आहेत. या नोंदणी प्रक्रियेच्या शुल्कातून शासनाला चार वर्षांत ३६ हजार ६०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
---
महसूल वृद्धीचे संकेत
रत्नागिरी तालुक्यातील नागरीकरण, जमिनींचे वाढते व्यवहार आणि मालमत्तेच्या दस्त नोंदणीतील सातत्यामुळे महसुली उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील या आकडेवारीने जिल्ह्याच्या आर्थिक व प्रशासकीय विकासाचे नवे चित्र समोर आणले आहे. एकंदरीत, फक्त रत्नागिरी तालुक्यापुरता विचार केला तरी ही आकडेवारी येथील वाढत्या आर्थिक उलाढालीची आणि दस्त नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शक गतीची साक्ष देणारी ठरणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.