-rat१४p११.jpg -
26O69951
चिपळूण - मंत्री विखेपाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार शेखर निकम.
---
पिंपळीखुर्दच्या मत्स्यबीज केंद्राला चालना
जागा हस्तांतरणाचा, प्रस्ताव सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : तालुक्यातील पिंपळीखुर्द येथे शासकीय मत्स्यबीज केंद्र उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या केंद्रासाठी प्रस्तावित असलेली जागा ‘महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा’च्या अखत्यारित असल्याने ती मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली होती. या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्य अभियंत्यांना जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
चिपळूण तालुक्यात मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी मत्स्य व्यवसाय साहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत तीन जागांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये मौजे पिंपळीखुर्द येथील गट क्र. २१ मधील जागा तांत्रिक व भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक योग्य असल्याचे स्पष्ट झाले. या जागेवर वीजपुरवठा, वर्षभर मुबलक पाणी आणि मुख्य जोडरस्त्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. तसेच शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार, येथील पाणी मत्स्यबीज निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. ही जागा सध्या कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे असल्याने ती हस्तांतरित करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. यावर मंत्री विखे-पाटील यांनी सकारात्मक शेरा मारून प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले.
----
मत्स्य व्यवसायाला चालना
पिंपळीखुर्द येथे हे केंद्र उभारल्यास स्थानिक मच्छीमारांना व मत्स्य व्यावसायिकांना दर्जेदार मत्स्यबीज स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, ज्यामुळे कोकणातील मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.