rat२p४.jpg-
७३७१६
देवरूख ः कोसुंब येथे केलेली झेंडूची लागवड.
rat२p५.jpg-
७३७१७
देवरुख ः झेंडू शेतीची पाहणी करताना कृषी अधिकारी.
-----------
शिक्षणासोबत झेंडू फुलशेतीचा यशस्वी प्रयोग
कोसुंबमधील दोन तरुणांची पाच गुंठ्यांत शेती; आतापर्यंत २५ हजारांचे उत्पन्न
देवरूख, ता. २ : शिक्षण घेतानाच शेतीत नवा प्रयोग करण्याच्या जिद्दीतून कोसुंब (ता. संगमेश्वर) येथील धनंजय जाधव आणि पार्थ करंडे या दोन तरुणांनी झेंडू फुलशेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अवघ्या पाच गुंठ्यांत झेंडूची लागवड करून त्यांनी आतापर्यंत सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.
धनंजय कायद्याचे तर पार्थ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. दोघांनी २२ जुलै २०२६ रोजी झेंडूच्या रोपांची लागवड करून प्रयोगाला सुरवात केली. शिक्षण सांभाळून स्वतः मेहनत घेत त्यांनी पाणी व्यवस्थापन, पिकाची निगा आणि फुलांची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केले. शेतीतील अनुभव कमी असल्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनासह ‘महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता’ या मोबाईल ॲपचा वापर केला.
पहिल्या तोडणीत सुमारे २२ किलो फुले मिळाली. विनोद जाधव यांच्या सहकार्याने ग्रामसुरक्षा दलासाठी फुलांची मागणी मिळाली. नवरात्रोत्सव, दसरा आणि दीपावलीच्या काळात फुलांना चांगली मागणी मिळाली. आई-वडिलांचे सहकार्य, आईच्या संपर्कातून मिळालेले ग्राहक तसेच जुगाई मंदिर परिसरातील विक्रीमुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली. फुलांचा रंग आणि बाजारपेठेचा अभ्यास करताना नारंगी फुलांचे प्रमाण अधिक तर पिवळ्या फुलांचे प्रमाण कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुढील हंगामात अधिक क्षेत्रावर लागवड करून या प्रयोगाला व्यावसायिक स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रयोगासाठी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी अंतेश्वर सुस्तरफोड यांचे मार्गदर्शन लाभले. कुटुंबीय, मित्र आणि ग्राहकांच्या सहकार्याबद्दल धनंजय यांनी आभार मानले.
------
चौकट
झेंडूच्या पिकावर थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव
झेंडूच्या पिकावर थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्याने काही झाडांचे नुकसान झाले. या वेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी झेंडूच्या बागेला भेट देऊन पिकाची पाहणी केली. त्यांच्यासोबत मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी अंतेश्वर सुस्तरफोड यांनीही मार्गदर्शन केले. प्रादुर्भाव झालेली झाडे काढून टाकण्याचा सल्ला देतानाच ‘महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता’ उपाययोजनेची माहिती देऊन त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून धनंजय यांनी पिकावरील रोग आणि किडींचे निरीक्षण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे पिकाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.