कोकण

शुक नदी किनाऱ्याला मिळणार दिलासा

सकाळवृत्तसेवा

वैभववाडी - शुक नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदीलगतच्या गावांत निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन उद्या (ता. ३०) खांबलवाडी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लगतच्या गावांतील ऊस शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बऱ्याचअंशी सुटणार आहे. याबाबत ‘सकाळ’ने शनिवारी (ता. २७) वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन हा निर्णय घेतला.

शुक नदीवर सोनाळी, नापणे, कुसूर, उंबर्डे, दिवशी, तिथवली या गावांतील ऊस शेती, तसेच पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी योजना अवलंबून आहेत; परंतु सध्या या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले असून, नदीपात्रातील मोठ्या डोहांनी देखील तळ गाठला आहे. त्यातच गेला आठवडाभर कडक उन्हाळ्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली असून, अंगाची लाही लाही होत आहे. परिणामी, विहिरींची पाणी पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे शुक नदीलगत असलेल्या पाच-सहा गावांत पिण्याच्या पाण्यासह शेकडो हेक्‍टर ऊस शेती संकटात सापडली आहे.

प्रचंड वाढलेल्या उष्म्यामुळे ऊस शेतीला भरपूर पाण्याची गरज भासते; मात्र नदीतच पाणी नसल्यामुळे शेतकरी कसाबसा शेतीला पाणीपुरवठा करताना दिसत आहे. नापणे, उंबर्डे कातकरवाडी या परिसरात नदीत मोठे डोह आहेत. या डोहामध्येच शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप बसविण्यात आले आहेत. या डोहांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ऊस शेतीला आता पाणी कमी पडले तर पिकाला ताण बसून त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत. ऊस शेती वाचविणे आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची भीषणता कमी करायची झाल्यास खांबलवाडी धरणाचे पाणी तत्काळ शुक नदीत सोडणे हा एकमेव पर्याय असल्याने नदीकाठच्या गावांतील शेतकरी व ग्रामस्थांतून खांबलवाडी धरणाचे पाणी तत्काळ शुक नदीत सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

या भीषण पाणीटंचाईचे चित्र ‘सकाळ’ने मांडले होते. याची दखल घेऊन खांबलवाडी धरणाचे पाणी शुक नदीत सोडण्याचा निर्णय लघुपाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार उद्या धरणाचे पाणी शुक नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. पाण्याअभावी संकटात असलेल्या शेकडो हेक्‍टर ऊस शेतीला संजीवनी मिळणार आहे.

शुक नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे उद्‌भवलेली परिस्थिती विचारात घेऊन खांबलवाडी धरणाचे पाणी नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या पाण्याचा लाभ घेणाऱ्यांपैकी मोजकेच शेतकरी पाणीपट्टी भरतात; तर बरेच पाणीपट्टी देत नाहीत. मात्र तसे न करता धरणातून सोडलेल्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी न चुकता पाणीपट्टी भरणा करावी.
- नंदकुमार साळवी, 

शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तर, फोंडाघाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT