T20 World Cup 2022 Rohit Sharma And Babar Azam Approach
T20 World Cup 2022 Rohit Sharma And Babar Azam Approach esakal
क्रीडा

Blog | T20 WC 22 : भरल्या 'पोटा'वर क्रांती होत नसते; बाबर लढून हरला, रोहितचं काय?

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2022 Rohit Sharma And Babar Azam Approach : सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडविरूद्ध 169 धावा केल्या. फायलनमध्ये पाकिस्तानने 137 धावा केल्या. 137 < 169 हे बालवाडीतील मुलगा देखील सांगू शकतो. आता आपण इंग्लंडने त्यानंतर काय केलं याकडे येऊया. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये 15 षटकात बिनबाद 170 धावा केल्या. विजय 10 विकेट्स राखून, एकदम दणदणीत! फायनलमध्ये इंग्लंडला 137 धावा करताना आपले पाच फलंदाज खर्ची घालावे लागले. सामना हातात आला तो 19 व्या षटकात. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही इंग्लंडकडूनच पराभूत झाले. मात्र या पराभवात जमीन आसमानाचा फरक आहे. बाबरच्या नेतृत्वातील पाकिस्तानची आणि रोहितच्या नेतृत्वातील भारताची तुलना केली तर बाबरचा पाकिस्तान हिरो ठरतोय तर रोहितचा भारत झिरो.

पाकिस्तानचा सध्याचा क्रिकेट जगतातील स्तर (खेळातील गुणवत्ता सोडून) हा एका तिसऱ्या जगातील देशाप्राणे अप्रगत, मागास असा आहे. तर दुसरीकडे भारत हा क्रिकेट जगतातील दादा देश आहे, सुपर पॉवर म्हटले तरी हरकत नाही. भारताचा हा क्रिकेट जगतातील दबदबा हा पैशाच्या जोरावर आहे. बीसीसीआय बक्कळ कमावते. त्याचा फायदा खेळाडूंपर्यंतही पोहचतो. सोन्याची अंडी देणारी कोंबडी (IPL) खेळाडूंनाही आर्थिक झळाळी देतेच. भारताकडे सध्या काय नाही? मागेल तितका पैसा आहे. जीवापाड प्रेम करणारे चाहते आहेत. क्रिकेट जगतात मान (यात पौशाचा वाटा खूप) आहे. संपूर्ण क्रिकेट जगत आयपीएलच्या कुंभमेळ्यात भारतात अवतरतं.

दुसरीकडे पाकिस्तानात तर गेली दशकभर कोणी फिरकत देखील नव्हते. त्यांना आपल्या कर्मांमुळेच हक्काचं घर सोडून भाड्याच्या घरात रहावं लागत होतं. कारण चांगल्यांचा (संघांचा) सहवास लाभावा. भारत तर पाकिस्तानला आपल्या वाऱ्याला देखील उभा करून घेत नाही. क्रिकेटमधील सुपर पॉवरने वाळीत टाकल्यानंतर पाकिस्तानची काय अवस्था झाली असेल हे आता वेगळं सांगायला नको. यामुळे पाकिस्तानकडे साधं स्वतःचं असं हक्काचं काहीच उरलं नव्हतं. ना पाकिस्तानचं आयसीसीत कोण ऐकून घेत नव्हतं का त्याला कोणी गांभिर्याने घेत नव्हतं. गेल्या काही काळात यात हळूहळू का होईना सुधारणा होत होती. मात्र सुपर पॉवर अजून त्यांच्याशी फारकत घेऊनच आहे.

थोडक्यात काय पाकिस्तान क्रिकेट जगतातही संघर्षच करत होता. संघर्ष करतच त्यांनी आपलं राहतं घर पुन्हा मिळवलं. आता क्रिकेट जगतात गेलेला मान आणि स्थान मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप ही त्यांच्यासाठी नामी संधी होती. मात्र ते अडखळत्या सुरूवातीनंतर चेष्टेचा विषय झाले. त्यांच्यावर घरातूनच प्रचंड प्रमाणात टीका झाली. सगळीकडे निराशेचे वातावरण होते. तरी बाबर हरला नाही. त्याने त्याच्या संघाचे खांदे देखील पडू दिले नाहीत.

दुसरीकडे रोहितचा संघ पहिल्यापासूनच संभाव्य विजेता होता. मात्र सुपर 12 मध्ये संभाव्य विजेते बांगलादेशकडून हरता हरता जिंकले. मात्र पाकिस्तानविरूद्ध विजयाचा घास त्यांच्या तोंडातून हिसकावल्याने सगळं कसं गुडीगुडी होतं. आता दशकभराचा वनवास संपणार असे वाटले. मात्र बलाढ्य आणि धनाड्य अशा टीम इंडियाने इंग्लंडविरूद्ध कच खालली. अशी तशी नाही तर तब्बल 10 विकेट्सनी... तसं तर सामन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्येच रोहितने संकेत दिले होते की, बाबांनो समोर इंग्लंड आहे, बॅटिंग डेप्थ 10 पर्यंत, तीन तीन ऑलराऊंडर, सात बॉलिंग ऑप्शन त्यात जॉस बटलर! आता आम्हीच ते संकेत ओळखू शकलो नाही त्याला तो तरी काय करणार म्हणा.

धनाड्य अन् बलाढ्य रोहितच्या संघाने विमानाची तिकिटे बुक करून घर गाठले. चाहते मात्र अजूनही शोककळेतच होते. कारण धनाड्य बलाढ्य रोहितचा संघ कोणताही प्रतिकार न करता इंग्रजांसमोर शरण आला होता. जणू काही माफीनामाच लिहिला होता. चूक झाली सेमी फायनलाला आलो. याउलट वाळीत टाकलेला, अप्रगत, मागास पाकिस्तान सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये पोहचला. ज्या संघाने सुपर 12 ची फेरी नेदरलँडच्या सबसीडीवर पार केली होती. आता तो संघ झुंजार आणि तडफदार दिसत होता. त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये काहीतरी मिळवण्याची, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची जिद्द दिसत होती. तसं त्यांनी फायनल गाठून स्वतःला करून दाखवलंही.

ऑस्ट्रेलियात एक गोष्ट सिद्ध झाली. तुमच्याकडे होवित्झर तोफ, राफेल विमान असून उपयोग नाही. तुमच्यात जर लढाऊ बाणाच नसेल तर तुम्ही ही निर्जीव शस्त्रे घेऊन काय करणार? तुम्ही लढाईत सपशेल हरणारच! तुम्हाला जर क्रांती करायची असेल तर काहीतरी मिळवण्याची भूक हवी. झगडण्याची वृत्ती हवी, शेवटपर्यंत हार न मानण्याची प्रवृत्ती हवी. म्हणतात ना भरल्या पोटावर कधी क्रांती होत नाही. त्यासाठी पोटात खड्डा पडायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT