नवी दिल्ली : बांगलादेश दौऱ्यावर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शीघ्रकोपीपणा दाखवत गैरवर्तन करणाऱ्या आणि सामन्यानंतर पंचांवरही टीका करणारी महिला कर्णधार हरमनप्रीतला बीसीसीआय लवकरच समज देणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी तसे संकेत दिले आहेत.
आम्ही तिच्याशी लवकरच संवाद साधणार आहोत, असे शहा यांनी सांगितले. हरमनप्रीतच्या वर्तनामुळे बीसीसीआयवरही टीका केली जात आहे. हरमनप्रीतवर आयसीसीने केलेल्या दोन सामन्यांच्या बंदीविरोधात अपील न करण्याचाही निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या त्या मालिकेत अस्तित्व पणास लागलेल्या भारताला अंतिम सामन्यात संघर्ष करावा लागत असताना पंचांनी हरमनप्रीतला पायचीत ठरवले. चेंडू आपल्या बॅटला लागल्यामुळे आपण पायचीत नाही, असा समज झालेल्या हरमनप्रीतने क्रीज सोडताना बॅट यष्टींवर जोरात मारली.
एवढ्यावरच ती थांबली नाही तर बक्षीस समारंभात पंचांना उद्देशून कुत्स्तीतपणे मतप्रदर्शन केले होते. आयसीसीने तिच्या सामना मानधनातील ७५ टक्के रक्कम कापून घेण्याबरोबर दोन सामन्यांची बंदीही घातली आहे.
हरमनप्रीतची लवकरच भेट घेतली जाणार आहे आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण तिला प्रश्न विचारतील, असे शहा म्हणाले. हरमनप्रीतने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर तिने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारतीय संघाचे आता बंगळूरमधील अकादमीत सराव शिबिर सुरू होईल. त्यानंतर हा संघ हाँगझाऊ येथे आशिया क्रीडा स्पर्धेत खेळण्यास रवाना होईल; परंतु बंदीमुळे हरमनप्रीतला पहिले दोन सामने खेळता येणार नाहीत.
...तर हरमनप्रीत कौर केवळ अंतिम सामना खेळणार
हाँगझाऊ येथे होणऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. अगोदरच दोन सामन्यांची बंदी असलेली हरमनप्रीत कौर भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला तर तो एकमेव सामना खेळण्याची वेळ तिच्यावर येईल.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागात भारत, पाक, श्रीलंका आणि बांगलादेश यांना थेट अंतिम टप्प्यात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने भारताला खेळावे लागतील. हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी आहे.
त्यामुळे ती हे सामने खेळू शकत नाही. केवळ अंतिम सामन्यासाठी ती उपलब्ध असेल. आयसीसीच्या रँकिंगनुसार या चार संघांना थेट अंतिम टप्प्यात प्रवेश देण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघही थेट उपांत्यपूर्व सामना खेळेल.
या स्पर्धेतील क्रिकेटमध्ये पुरुषांचे १८, तर महिलांचे १४ संघ पात्र ठरले आहेत. महिलांची स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होत असून सुवर्णपदकाची लढत २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुरुषांचे सामने २८ सप्टेंबरपासून सुरू होत असून अंतिम सामना ७ ऑक्टोबर रोजी आहे.
सलग तीन दिवस सामने
भारतीय पुरुषांचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्यांना सलग तीन दिवस उपांत्यपूर्व (५ ऑक्टोबर), उपांत्य (६ ऑक्टोबर) आणि अंतिम (७ ऑक्टोबर) सामने खेळावे लागतील. स्पर्धेच्या एकूणच ड्रॉनुसार उपांत्यपूर्व फेरीचा सामना अफगाणिस्तान किंवा बांगलादेशविरुद्ध खेळावा लागेल. याच वेळेस भारतात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश यांचे सुरुवातीलाच सामने आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांचे दुसऱ्या फळीचे संघ आशिया स्पर्धेसाठी पाठवले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.