Rohan Bopanna
Rohan Bopanna 
क्रीडा

'अर्जुन'वरून बोपण्णाचा 'आयटा'वर तीर 

पीटीआय

नवी दिल्ली : दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने 'आयटा'विषयीचा संताप व्यक्त केला. 

आपला अर्ज निर्धारित मुदतीत पाठविला नाही, असा बोपण्णाचा मुख्य आक्षेप आहे. 28 एप्रिल रोजी ही मुदत उलटून गेली. त्यानंतर बोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाची जोडीदार गॅब्रिएला डॅब्रोस्की हिच्या साथीत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यानंतर 14 जून रोजी त्याचे नाव पाठविण्यात आले. पुरस्कार निवड समितीने निर्धारित मुदतीत आलेल्या अर्जांचाच विचार केला. त्यामुळे साकेतला पसंती मिळाली. यापूर्वी बोपण्णाचे नाव अनेक वेळा पाठविण्यात आले; पण ते नाकारण्यात आले. 

या पार्श्‍वभूमीवर बोपण्णाने 'आयटा'चा स्पष्ट उल्लेख केला. तो म्हणाला, की 'आम्ही व्यावसायिक टेनिसपटू आहोत. देशाचा लौकिक उंचावण्यासाठी आम्ही खूप काही पणास लावतो. आमच्या निष्ठेविषयी कुणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही; पण 'सिस्टिम' (या संदर्भात संघटना) ठिसाळ कारभार करते तेव्हा आमचा अनादर होतोच; पण उचित बहुमान मिळण्याची आशाही धुळीस मिळते. माझे नाव निर्धारित मुदतीत पाठविले नाही. यावरून 'आयटा'मध्ये व्यावसायिकता आणि सक्षम कारभाराचा अभाव दिसतो. पूर्वीसुद्धा माझ्या बाबतीत असे घडले. त्या वेळीसुद्धा संघटना माझ्या पाठीशी उभी राहिली नाही.' 

कामगिरीतील फरक 
निवड समितीने जानेवारी 2013 ते डिसेंबर 2016 दरम्यानच्या कामगिरीचा विचार केला. यात बोपण्णाने व्यावसायिक टेनिसपटू म्हणून 'टूर'वर लक्षवेधी कामगिरी केली; पण देशासाठी बहुविध क्रीडा स्पर्धांत तो असे यश मिळवू शकला नाही. त्याने जुलै 2013 मध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली. नऊ एटीपी विजेतिपदे त्याने पटकावली. यात 2015च्या माद्रिद मास्टर्स जेतेपदाचा समावेश आहे. देशासाठी खेळताना मात्र रिओ ऑलिंपिकमध्ये तो सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत ब्रॉंझपदक जिंकू शकला नाही. या जोडीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यानंतरही ऑलिंपिकमुळे 'आयटा' त्याचा अर्ज पाठवू शकली असती; पण तसे झाले नाही. 

दुसरीकडे साकेतला 'टूर'वर फारशी भरीव कामगिरी करता आली नाही; पण त्याने 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके मिळविली. सानिया मिर्झासह तो मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर सनम सिंग याच्या साथीत त्याने दुहेरीत रौप्यपदक जिंकले. केंद्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी ऑलिंपिक, आशियाई अशा स्पर्धांतील पदकासाठी जास्त गुण मिळतात. साकेतला त्यामुळेच झुकते माप मिळाले. 

'कटा'चा फटका 
रिओ ऑलिंपिकच्या वेळी बोपण्णाने पेसच्या विरोधात उघड भूमिका घेतली. त्याला महेश भूपतीने चिथावणी दिल्याची चर्चा झाली. बोपण्णाने सरस जागतिक क्रमांकाच्या जोरावर जोडीदार निवडण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा केला. त्याने साकेतला पसंती दिली होती; पण 'आयटा'ने त्याला पेसच्या साथीत खेळण्यास भाग पाडले. यावरून बराच वाद झाला. अखेरीस रिओमध्ये ही जोडी पहिल्याच फेरीत हरली. 

'आयटा'चे प्रत्युत्तर : आधी निकष पाहून मग बोलावे 
'आयटा'चे सरचिटणीस हिरण्यम चॅटर्जी यांनी निर्धारित मुदतीत बोपण्णाचा अर्ज न पाठविण्याच्या निर्णयाचे, मुदत उलटल्यानंतरही तो पाठविण्याच्या कृतीचे समर्थन केले. त्याने निराश होण्याचे कारण नाही. आधी त्याने निकष पाहावा आणि मगच बोलावे असे प्रत्त्युत्तरही चॅटर्जी यांनी दिले. ते कंबोडियामध्ये 'आयटीएफ'च्या वार्षिक सभेसाठी गेले आहेत. तेथून 'पीटीआय'ला त्यांनी सांगितले की, दरवेळी बोपण्णाचा अर्ज फेटाळला जायचा, कारण त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी एकही पदक जिंकलेले नाही. हे आम्हाला ठाऊक होते. या वेळी आम्ही एक संधी घेऊन पाहिली, कारण त्याने ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले होते. ही कामगिरी जागतिक पदकाच्या तोडीची आहे. त्यामुळे अर्ज पाठवावा असे आम्हाला वाटले. पुरस्कार मिळाला नाही म्हणून त्याने निराश होणे मी समजू शकतो, पण आधी त्याने 2016 मधील निकष पाहावेत. त्यानंतरच त्याने भाष्य करावे.' 

आता मात्र फ्रेंच विजेतेपदामुळे तो पुढील वर्षी नक्की पात्र ठरेल आणि आम्ही त्याचे नाव नक्की पाठवू आणि पुरस्कारासाठी प्रयत्न करू, असेही चॅटर्जी यांनी नमूद केले. 

साकेतचे कौतुक 
बोपण्णाने सांगितले की, 'मी याप्रसंगी साकेतचे अभिनंदन करू इच्छितो. मला फार अभिमान वाटतो, कारण त्याने खेळाडू म्हणून केलेली प्रगती आणि एक माणूस म्हणून त्याने आज जे काही साध्य केले आहे ते मी पाहिले आहे.' 

दुसरीकडे बोपण्णाने इंचॉनमधील स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याला 'टूर'वरील स्पर्धांत गुण राखायचे होते. त्यामुळे त्याच्यासह काही वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घेण्याची परवानगी 'आयटा'ने दिली होती.

अर्जुन पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT