Mansi Naik sakal
लाइफस्टाइल

आयुष्यातही रंग भरणारी रांगोळी

अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत माझ्या आयुष्यानं अनेक वळणं घेतली. प्रत्येक वळणावर माझे छंद बदलत गेले.

मानसी नाईक

अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत माझ्या आयुष्यानं अनेक वळणं घेतली. प्रत्येक वळणावर माझे छंद बदलत गेले. मला परफेक्शनिस्ट राहायला आवडतं. मी पेंटिंग, पॉटरी, कुकिंग, मेंदी काढणं असे बरेच छंद जोपासले आहेत; पण लहानपणापासूनचा आवडता छंद म्हणजे रांगोळी काढणं. मी याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलं नाही; पण एक आवड म्हणून मी ती जपत गेले आणि यापुढेही मी ती जपणार आहे.

हा छंद लागण्याचं मुख्य कारण म्हणजे रंग. मला वेगवेगळ्या रंगांशी खेळायला, बोलायला खूप आवडतं. त्यामुळे रांगोळीत वापरलेले रंग मला एक प्रकारची ऊर्जा देतात आणि मला असं वाटतं, रांगोळीप्रमाणेच आपण आपल्या आयुष्यातही रंग भरले पाहिजेत. प्रत्येक रंग आपल्याला खूप काही शिकवून आणि सांगून जातो.

मी लहान होते, तेव्हा सोपी अशी ठिपक्यांची रांगोळी काढायचे. आता मी मोठमोठ्या रांगोळ्या काढते. मी यूट्युबवर खूप व्हिडिओज बघते, अनेकांना फॉलो करते. घरच्यांचं म्हणणं असं असतं, की तू एवढ्या गोष्टी करू शकतेस, तर ही गोष्टही करू शकतेस, त्यामुळे तू करत राहा. माझ्या घरचेही मला रांगोळ्यांचे व्हिडिओ पाठवतात, रांगोळ्या सुचवत असतात. माझी आई आणि आजी या दोघीही नेहमीच मदत करत असतात.

प्रत्येक सणावाराला, कार्यक्रमाला माझ्या घराच्या दारात हमखास रांगोळी असतेच. आजकाल आपली कला दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा होत असलेला वापर पाहून मला छान वाटतं. सोशल मीडियाद्वारे आपण खूप काही शिकू शकतो. त्यामुळे मला असं वाटत नाही, की आता मला रांगोळीसंदर्भातील शिक्षण घ्यायला इतर कुठं जावं लागेल. सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध आहे; पण ज्याला इच्छा आहे, ते या विषयातलं शिक्षण घेतात.

मी नेहमी व्हिडिओ पाहून रांगोळी काढत असते, त्यामुळे मी विशिष्टच प्रकारे रांगोळी काढत नाही. एका चौकटीत मी स्वतःला बांधलेलं नाही. बऱ्याचदा मी माझ्या कल्पनाशक्तीचा वापर करून दारात किंवा देव्हाऱ्यासमोर रांगोळी काढते. कधी फुलांचा वापर, कधी वेगवेगळे आकार, ठिपके असे वेगवेगळे प्रयोग मी करत असते.

रांगोळीसाठी एखादा रंग मिळाला नाही, तर मी बऱ्याचदा विविध रंग एकत्र करून तो रंग तयार करते. विशेषतः दिवाळीत मला रांगोळीवर दिव्यांची आरास करायला आवडतं. मी आवर्जून माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर यासंदर्भातले व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते. माझ्या चाहत्यांपर्यंत या रांगोळ्या मी पोहोचवत असते. त्यातून अनेक चाहते माझं कौतुकही करतात. कधीकधी मी रांगोळी काढते आणि माझी आई त्यावर दिव्यांची आरास करते. माझ्या आईला माझा हा छंद आवडतो. त्यामुळे तिच्या कौतुकासाठी खास मी रांगोळी काढते.

आपला छंद जोपासायचा याची वेगवेगळी उत्तरे आपल्याला ऐकायला मिळतील; पण माझ्यासाठी छंद म्हणजे मी आहे. माझा छंद पाहून माझ्यातलं एक वेगळं रूप लोकांना कळतं. मी रांगोळी कुठल्या प्रकारे काढलेली आहे, त्यावरून माझी मानसिकता कळते. रंगांकडे कलाकारानं आकर्षित होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. माझ्या क्षेत्रात मला रंगीत वेशभूषा करावी लागते. मेकअप चढवावा लागतो.

त्यामुळे चेहऱ्यावरचा मेकअप आणि रांगोळीतले रंग याचं काही नातं आहे, असं मला सतत वाटत असतं. मी आध्यात्मिकपणे, श्रद्धेनं रांगोळी काढते, म्हणून मी काढते ती रांगोळी सुंदर दिसते. प्रत्येकवेळी मी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. या छंदात तुमच्या कल्पनाशक्तीचा कस लागतो. माझी चित्रकला चांगली असल्यानं मला थोडं सोपं जातं; पण यातले बारकावे मी जाणून घ्यायचा प्रयत्न करते. दोन बोटांत रांगोळी पकडून कलाकुसरण करणं अवघड आहे आणि संयमाचं काम आहे. तेही मी यातून शिकत गेले.

आपल्या आयुष्यातही आपण या रांगोळीप्रमाणे रंग भरायला हवेत. आयुष्यातील एक कोणतातरी रंग उडाला म्हणून ती जागा मोकळी ठेवू नये. नुसती पांढरी रांगोळी आणि रंगीत, पद्धतशीरपणे काढलेली रांगोळी या दोन्हींचंही महत्त्व आहे. तुमच्या आयुष्याच्या रांगोळीत तुम्ही कसे रंग भरता, कोणते रंग भरता यावरून तुमची मानसिकता दिसते. रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक सणावाराला, कार्यक्रमाला मी घरी रांगोळी काढते आणि आयुष्यातही रंग भरण्याचा प्रयत्न करत असते.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर- इंगळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

Leopard Attack: दुर्देवी घटना! 'पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू'; वडील अन् आईचा आक्राेश, जमावाने वन विभागाची गाडी जाळली

Akola News : “मी शौचास जाते, तुम्ही घरी जा”; शेजारच्या काकूंसोबत शेतात गेलेली अल्पवयीन तरुणी अचानक बेपत्ता, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar: अजितदादांची विजयी घोडदौड कायम! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोर

Kolhapur Old Video : कसं होतं 125 वर्षांपूर्वीचं कोल्हापूर? पाहा छत्रपती शाहूंच्या करवीर नगरीचा ऐतिहासिक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT