Listen sakal
लाइफस्टाइल

काय ऐकताय सध्या?

अभिनेत्री मृणाल ठाकूरची मुलाखत ऐकत होते. नॉन-फिल्मी बॅकग्राऊंडमधून आलेली ही अभिनेत्री. तिचं राहणीमानही फार वलयांकित नाही.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. समीरा गुजर-जोशी

अभिनेत्री मृणाल ठाकूरची मुलाखत ऐकत होते. नॉन-फिल्मी बॅकग्राऊंडमधून आलेली ही अभिनेत्री. तिचं राहणीमानही फार वलयांकित नाही. कमी कालावधीत आणि लहान वयात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटात पुष्कळ यश कमवूनही पाय जमिनीवर टिकवून असणारी अभिनेत्री म्हणून मला ती आवडते. त्यामुळे साहजिकच मी कुतूहलानं ऐकत होते. ती तिच्या प्रेरणांविषयी सांगत होती. ती म्हणाली, की तिला प्रियांका चोप्रा अतिशय आवडते.

तिचा आत्मविश्वास, तिचं काम तिला प्रभावित करतं आणि म्हणून ती तिचं एकही पॉडकास्ट ऐकणं सोडत नाही. तुमच्या लक्षात आलं आहे का? ऐकणं हे क्रियापद आत्तापर्यंत किती वेळा इथं परत परत वापरलं गेलं आहे आणि पॉडकास्ट हा शब्दही त्या ऐकण्याशी निगडित आहे.

अलीकडे इतक्यांदा हा शब्द कानावर पडतो. आपल्याला टीव्हीवरचं ‘टेलिकास्ट’ माहीत आहे, आकाशवाणी, दूरदर्शन याबाबत आपण ‘प्रसारण’ या अर्थी ‘ब्रॉडकास्ट’ हाही शब्द वापरतो. अलीकडे आपण मोबाईल टीव्हीला जोडला, तर त्याला ‘मिरर-कास्ट’ असं म्हणतो. मग आता ‘पॉडकास्ट’ म्हणजे काय? यातला पॉड हा शब्द गमतिशीर आहे. त्याचा फुल फॉर्म आहे - प्ले ऑन डिमांड - तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ऐकता येतं.

मला या अर्थाची उकल झाल्यावर सहज भूतकाळात जायला झालं. पूर्वी किती घरांमधील सकाळ ही ‘नमस्कार हे आकाशवाणीचं अमुक केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात..’ या शब्दांनी व्हायची. त्या सुमधुर भक्तिसंगीताच्या तालावर घराघरांत ‘संसार-राग’ आळवला जायचा. डब्यासाठी पोळ्या लाटल्या जात असताना, फोडणी दिली जात असताना एखादं आवडीचं गाणं लागलं, की पटकन ‘वाह’ची दाद जायची.

दिनविशेष सांगितला जात असताना घरातल्या लहान मुलांना ‘‘ऐकलंस का हे? लक्षात ठेवण्यासारखं आहे हे,’’ असं आपोआप सुचवलं जायचं. दुपारी वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कधी मुलाखत, कधी एखाद्या विषयाची ओळख, कधी चर्चा अशा किती प्रकारे नवी माहिती मिळायची हे आठवलं. आजही हे सारं आहेच. पण या ‘प्ले ऑन डिमांड’नं आपल्या ऐकण्याच्या शक्यता किती वाढवल्या आहेत.

मोबाईल आणि एअर पॉडच्या जमान्यात आपल्याला हवं ते, आपल्याला हवं तेव्हा आणि हवं तिथं ऐकता येणं शक्य आहे. आपण दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे सतत काहीतरी बघत असतो; पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या मेंदूला बघण्यापेक्षा ऐकणं अधिक सोपं किंवा कमी श्रमाचं असतं.

काय होतं, की आपण जेव्हा व्यक्तीला पाहून ऐकत असतो, तेव्हा तो व्यक्ती बोलत असलेल्या शब्दांचा अर्थ तर मेंदू लावत असतोच; पण त्याचबरोबर तो वक्ता जी देहबोली वापरतो आहे, त्याचाही अर्थ लावत असतो. त्यामुळे मेंदू अधिक थकतो; पण पॉडकास्ट ऐकत असताना वक्ता दिसत नसल्यामुळे हे श्रम वाचतात. शिवाय आपोआपच आपलं लक्ष हे बोलल्या जाणाऱ्या शब्दांकडे वेधलं जातं.

आधुनिक संशोधन असं सांगतं, की रोज पॉडकास्ट ऐकण्यानं आपल्या cognitive skills वर सकारात्मक परिणाम होतो. आपली आकलनक्षमता आणि स्मरणशक्ती दोन्हींमध्ये सुधारणा होते. अर्थात इथं आपण संगीत ऐकणं याचा विचार करत नाही आहोत, तर काही माहितीपूर्ण मुलाखत वा व्याख्यान ऐकणं याविषयी विचार करूया.

कारण संगीत ऐकण्याचे फायदे तर आपल्याला सुपरिचित आहेत; पण पॉडकास्टमध्ये आपल्या आवडीच्या विषयावर विचार ऐकण्याचे अगणित फायदे आहेत. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ऐकत असताना आपण मेंटल इमेजेस अर्थात मानसिक प्रतिमा तयार करतो, ज्यानं आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. ऑडिओ- विज्युअलच्या जगात मेंदूला शब्द आणि त्याच्याशी निगडित प्रतिमा आयत्या मिळाल्या, की तो आळशी बनतो. इथं मात्र तो आपोआप सक्रिय होतो. आपण शब्द काळजीपूर्वक ऐकतो.

अटेन्शन म्हणजेच लक्ष देणं हे एक कौशल्य आहे. प्रत्येकाचा एक अटेन्शन स्पॅन किंवा कालावधी असतो, जेव्हा आपण ऐकलेलं पूर्ण लक्ष देऊन उत्तमप्रकारे समजून घेतो. अभ्यास असं सांगतो, की नियमित पॉडकास्ट ऐकणाऱ्यांचा ‘अटेन्शन स्पॅन’ सुधारतो. अर्थात आपल्या आध्यात्मिक परंपरेतही हेच सांगितलं आहे - आत्मज्ञानाच्या पायऱ्या म्हणून श्रवण- मनन -निदिध्यास असा क्रम सांगितला आहे.

आधी ऐकणं, मग त्यावर मनात चिंतन करणं. निदिध्यास या शब्दाविषयी डॉ. सदानंद मोरे यांनी संत तुकारामांच्या एका अभंगाचा आधार घेऊन निजध्यास असा पर्यायी शब्द सुचवला आहे. एखादी गोष्ट ऐकून, ऐकून, तिच्यावर विचार करून ती आपला ध्यास बनते. निज म्हणजे आपण स्वतः म्हणजेच ती ‘आत्मज्ञान’ बनते. थोडक्यात आपल्या मौखिक परंपरेत श्रवणाला महत्त्व होतंच, त्याचं पॉडकास्ट हे आधुनिक रूप आहे.

पूर्वी श्रवण करण्यासाठी वक्त्यापर्यंत जावं लागत होतं. आता ‘प्ले ऑन डिमांड’ शक्य आहे. हळूहळू वाचनाची जागा तुलनेनं ऐकणं घेत आहे. पूर्वी आपण एकमेकांना विचरायचो, ‘काय वाचताय सध्या?’ त्याऐवजी आता ‘काय ऐकताय सध्या?’ विचारायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT