डॉ. लीना निकम
Adhik Maas 2023 : काय मज्जा आहे बुवा जावयांची या महिन्यात! त्यांना घरी जेवायला बोलावून गोडधोड पदार्थ करणं, पाटावर बसवणं, समोर रांगोळी काढणं, ओवाळणं, कपडे, चांदी, सोने, तांबे, अनारसे, बत्तासे, मैसूर पाक अन् काय काय. अधिक महिना आणि जावयाला दान हे समीकरण आपल्या मनात अगदी पक्कं रूतून बसलंय. पण, हल्ली या दानाचे स्वरूप बदलले आहे.
जशी सून घरी येते आणि एक नातं घराला मिळतं तसंच जावई हे नातं घराला मिळालं की घर सुखावतं. आता तर सून म्हणजे मुलगी आणि जावई म्हणजे मुलगा असा ट्रेंड आला आहे. तो चांगलाही आहे. पण कधी कधी या नात्याचा अतिरिक्त बाऊ केला जातो आणि मानपान, रुसवे-फुगवे, हेवेदावे वाढीला लागतात. काही काही जावई फार अकडू असतात. सासरहून मला हे पाहिजे अन् ते पाहिजे असं सारखं मागणं चालू असतं. अधिक महिन्यात तर ते जास्तच पसरतात. कोणी आनंदाने, खुशीने देत असेल तर ठीक; पण जबरदस्तीने स्वीकारण्यात काय हशील?
सध्या दुकानांमध्ये रेलचेल आहे. सराफा बाजार तेजीत आहे. हॉटेल्स फुल्ल आहेत. शनिवारी, रविवारी तर हॉटेल्समध्ये पाय ठेवायला जागा नसते. गेल्या रविवारी आम्ही जेवणाचा बेत आखला तर सर्व हॉटेल्स फुल्ल. शेवटी एक मिळालं. तिथे एका अख्खं कुटुंब जेवायला आलं होतं. चांगले २५ जण.
पण कुठल्याशा कारणावरून एक जावई संतापला होता. तो हॉटेलच्या बाहेर गेल्यावर काही जण समजवायला सरसावले. हा मात्र डोक्यात राख घालून. त्याच्या बायको, मुलांची मान शरमेने खाली गेली होती. जावई म्हणून इतकी अकड का दाखवतात माणसं? यात तो स्वतःचेच नुकसान करून घेतो, असे नाही का वाटत? जावयाने जर अकड काढून नातं निभावलं तर किती छान होईल?
यावर्षी अधिकात अनेक गोष्टी नवीनच ऐकायला मिळताहेत. आईची ओटी भरा ही त्यापैकीच एक. हा शोध व्हाट्स अप युनिव्हर्सिटीनं लावलेला दिसतो. आधीच आपल्या भारतीय संस्कृतीत प्रथा-परंपरांना कमी नाही. पूर्वीच्या काळी जावयाला फक्त एका ताटलीत ३३ अनारसे घालून देण्याची प्रथा होती. त्यासोबत मुलीला एखादा खण. आता ते तांब्याचं वाण काय, तांब्याचा दीप काय, यावर्षी तर म्हणे चांदीचे दान करावे म्हणजे तुमच्या मागची संकटं दूर होतील. कुणी सांगितलं हे? आणि कुणी ठरवलं हे?
कालगणनेचा फरक नोंदवण्यासाठी योजलेल्या गणितीय आणि भौगोलिक गोष्टींचा विनाकारण धार्मिकतेशी संबंध जोडण्यात आला. जावयाला द्यायचं सोन्या-चांदीचे वाण हे तर अजिबात परंपरेतून वगैरे आलेलं नाही. तो निव्वळ सेलिब्रेशनचा फंडा आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर ८० वर्षांच्या आहेत. त्या म्हणतात, ‘माझ्या संपूर्ण वयात यावर्षीसारखं अकारण माजलेलं स्तोम कधी बघितलं नव्हतं’. (Lifestyle)
यासंदर्भात सोशल मीडियावर जेवढ्या पोस्ट्स यावर्षी पडल्या तेवढ्या कधीच पडल्या नव्हत्या. आपणाला माहिती हवे की मराठी महिने चंद्रावर आधारित असतात. या चांद्रमासाला सौरवर्षाशी जुळवून घेण्यासाठी आणि कालगणना एकसारखी होण्यासाठी पंचांगकर्त्यांनी अधिक महिन्याची योजना केली. दर पावणेतीन वर्षांनी अधिक मास येतो.
ग्रेगोरियन कालगणना म्हणजे इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर ३६५ दिवसांत एक वर्ष पूर्ण होतं; पण चांद्रमासाचा विचार केला तर ३५४ तिथींचं एक वर्ष असतं. हा अकरा दिवसांचा अनुशेष तिसऱ्या वर्षात अधिक महिन्याच्या निमित्ताने भरून निघतो. एवढं साधं गणित आहे. पण यात दानाचं महत्त्व वाढवून, अकारण प्रथा, कर्मकांड त्यात घुसवून स्तोम वाजवण्याची काय गरज आहे? (Adhik Maas)
दानच करायचं असेल तर आमची पुण्याची मैत्रीण ॲड. शैलजा मोळक यांनी केलेल्या दानासारखंही करता येईल. त्यांनी अकरा विधवा बायकांची ओटी भरून साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान केला. अनेक जणी हळदी-कुंकू लावताना गहिवरल्या. प्रश्न हळदी-कुंकू लावून साडीचोळी देण्याचा नाही तर त्यांचा सन्मान करण्याचा आहे. जो पती गेल्यानंतर आजपर्यंत कोणी केला नव्हता. काळ बदलला तसे आपणही बदलायला हवे नाही का? नाहीतर हे अधिकाधिक वाढत जाणारे धार्मिक आणि सांस्कृतिक आक्रमण आपल्याला कुठवर घेऊन जाईल सांगता येणार नाही.
डॉ. लीना निकम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.