- डाॅ. जयश्री फडणवीस
कृतज्ञता ही मानवी मनातील एक सर्वांत सुंदर, श्रेष्ठ व निरपेक्ष भावना आहे. जी व्यक्त केल्यानं माणसाला फक्त आनंद आणि आनंदच प्राप्त होतो. कृतज्ञता सुंदर भावनांचं मिश्रण आहे. कधी कौतुक, तर कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीचे मानलेले आभार.
अशा या भावना व्यक्त केल्यानं सकारात्मकता तर वाढतेच; पण त्याचबरोबरीने मानवी स्वभावात नम्रपणाही खोलवर रुजत जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक आव्हानांना सातत्यानं तोंड देत असतो. अशा वेळी कुणी सहजच आपलं कौतुक केलं, तर मनास एक वेगळीच उभारी मिळते.
मानसशास्त्रीय संशोधनात ‘कृतज्ञता’ ही उत्तम मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची बाब असल्याचं अनेक ठिकाणी नमूद केलेलं दिसतं. त्याची जोपासना सातत्यानं करायला हवी.
आपल्याला अगदी बालवयापासून आभार मानायला, Thank you म्हणायला शिकवलं जातं. एक शिष्टाचार पाळण्याचा आग्रह केला जातो; पण जसजसं वय वाढत जातं, तसतसा आपल्यातील नकळत निर्माण झालेला अहंकार कृतज्ञतेपासून दूर नेतो.
कृतघ्नपणा बळावतो. अनेकदा माणूस एखाद्या नात्यात आलेला नकारात्मक अनुभव मनात धरतो आणि त्या आधी केलेल्या ९९ सकारात्मक गोष्टी अथवा अनुभव विसरून जातो. ९९/१ असं नकारात्मतेचं प्राबल्य असतं आणि चांगल्या माणसाला कृतघ्न बनवतं.
इथं मनोविकारांचीही सुरुवात होते. अहंकारी मन वरवर खूप आत्मविश्वासानं जगत असलं, तरी अंतर्मन अपराधीपणाच्या भावनेत खंतावत असतं. मग माणसाची झोप उडते. मग चिंताग्रस्त होऊन अनेक शारीरिक व्याधी बळावत जातात.
याउलट कृतज्ञता व्यक्त केल्यानं छान झोप लागते. झोप छान झाल्यानं येणाऱ्या दिवसातील कामं उत्तमपणे पार पाडली जातात. शारीरिक क्षमता वाढून शरीर निकोप आणि निरोगी राहतं. जीवन चैतन्यमय झाल्यानं माणूस दीर्घायू होतो.
मानवी नातेसंबंधांंमध्ये कृतज्ञता एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करते. प्रत्येकाचं योग्य वेळी कौतुक केल्यानं; तसंच आभार प्रदर्शित केल्यानं एकमेकांप्रती प्रेम आणि आदर वाढत जातो. इथं एक नियम पाळायला हवा तो म्हणजे कौतुक हे चारचौघांमध्ये केलं पाहिजे, तर टीका खासगीत करणं योग्य.
देवयज्ञ : देवानं या पृथ्वीतलावर जगण्यासाठी जल, वायू, आकाश, अग्नी आणि पृथ्वी ही तत्त्वं निर्माण केली. या सर्वांतूनच आपली दिनचर्या सुरू होते, म्हणून त्या देवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं.
मातृ-पितृयज्ञ : आपल्याला जन्म दिला, उत्तम संगोपनातून एक सज्ञान व समृद्ध व्यक्ती बनवलं, त्यांच्याबाबत कृतज्ञ राहणं. त्यांना आपल्या वर्तनानं कोणताही मानसिक त्रास होणार नाही याकडे लक्ष देणं. वर्धक्यात त्यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करणं.
ऋषियज्ञ : आपली बुद्धिकौशल्यं कशी वापरावीत, तसंच शास्त्र, तत्त्व, विविध अध्ययनं करण्यासाठीचं मिळणारं मार्गदर्शन या सर्वांतून मिळणाऱ्या वैचारिक सामर्थ्यातून ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवणारे समस्त गुरुजन, त्यांच्याबाबत कायमच कृतज्ञ राहणं.
भूतयज्ञ : पृथ्वीवरील जीवसृष्टी- जसं की वृक्ष, पशुपक्षी आणि आपण मानव सर्व परस्परांवर अवलंबून आहेत, ‘जीवे जीवश्व जीवितम्’ म्हणून सर्वांप्रती असणारी कृतज्ञता.
समाज-मनुष्य यज्ञ : आपण कायम एकमेकांच्या मदतीनं जगत असतो आणि म्हणूनच या समाजाचंही देणं लागतो. प्रत्येक मनुष्याप्रती असलेली कृतज्ञता- मग तो शत्रू असला तरीही.
कृतज्ञता रोजनिशी : झोपण्यापूर्वी दिवसभरातील विधायक घटना लिहून काढून रोज रात्री देवाजवळ कृतज्ञता व्यक्त करणं.
२. माइंडफुलनेस : येणारा प्रत्येक क्षण आनंदानं जगणं- जसं की उगवणारा सूर्य, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, माझं सुंदर सुरक्षित घर याबद्दल कृतज्ञता.
३. आभार प्रदर्शन : प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी समोरचा आपल्यासाठी करत असतो. त्याच्यासाठी मनापासून बोलून आभार व्यक्त करणं. (मनातल्या मनात नकोत.)
४. दृष्टिकोनात बदल : आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. याची सुरवात आपल्या सुदृढ तन-मनापासून होईल.
५. मदत : सतत समोरच्याला मदत करा. एखाद्या आजीला जिना चढताना नुसता हाताचा आधार दिलात, तरीही एक वेगळाच आनंद मिळेल.
६. तुलना : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती.’ त्यामुळे कोणाशीही तुलना करू नका. प्रत्येकाची जगण्याची पद्धत; तसंच परिस्थिती वेगवेगळी असते.
७. आत्मसन्मान व स्वयंसूचना : स्वतःकडेही लक्ष द्या. प्रत्येक यश साजरं करा. उत्तम आरोग्य व यशप्राप्तीसाठी स्वयंसूचनांचा वापर करा.
उद्याच्या रम्य आठवणींकरीता आज कृतज्ञतापूर्वक आयुष्य जगलो, तर आयुष्याच्या संध्याकाळी कृतकृत्य वाटेल.
जानेवारी २०२३पासून मी ‘मानससूत्र’ मालिका लिहिते आहे. या लेखनासाठी संधी देणाऱ्या ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूहाबाबत आणि सातत्यानं प्रतिसाद देणाऱ्या वाचकांबाबत मी कृतज्ञता व्यक्त करते. वाचकांच्या प्रतिसादामुळे मला पुढील लेखांची ऊर्जा मिळत गेली. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.