sejal transgender google
लाइफस्टाइल

बारावीला ८२ टक्के तरी भीक मागायची वेळ... 'त्या' प्रश्नाने 'ती'चं आयुष्य बदललं

तिच्या 'वेगळे' असण्याची कल्पना आल्यानंतर ती आईवडिलांपासून दुरावली.

नमिता धुरी

मुंबई : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू सेवा केंद्र) नुकतंच सेजलकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. यातील विशेष बाब म्हणजे सेजल तृतीयपंथीय आहे. तिच्या 'वेगळे' असण्याची कल्पना आल्यानंतर ती आईवडिलांपासून दुरावली. त्यानंतरचा तिचा खडतर प्रवास तिने उलगडून सांगितला.

उत्तराखंडमधील पितूरगड या गावात सेजलचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत तिचं पालन-पोषण आई-वडिलांनी केलं. ती तृतीयपंथीय असल्याचं समजताच मात्र त्यांनी तिला न स्वीकारता महाराष्ट्रातील नांदेडमध्ये 'गौरी बकस' या तृतीयपंथीयांच्या गुरूंकडे आणून सोडलं.

या वयात सेजलला काहीच कळत नव्हतं. पहिल्यांदाच ती आई-वडिल, घरातील सदस्यांना सोडून दूर राहात होती. तिच्यासाठी सगळंच नवीन होतं. खायचं, प्यायचं आणि झोपायचं हेच करत होती ती. "माझ्यावर आई-वडिलांचं खूप प्रेम होतं. पण, समाजात त्यांचीही काही किंमत आहे. माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या समाजात आले, असं म्हणणंही चुकीचं ठरू नये,” असं सेजल सांगते.

सेजल म्हणते, आई-वडिलांवर माझा कोणताही आक्षेप नाही. त्यांच्यामुळे हे जग पाहाते आहे. ते माझे जन्मदाते आहेत. साहजिकच त्यांची नेहमीच आठवण येते. रस्त्याने लेकराबाळांना त्यांच्या आई-वडिलांसोबत जाताना पाहून मला पप्पांची आठवण येते. एकेकाळी माझे पप्पाही मला शाळेतून आणायचे, सोडायचे. दिवाळी, दसरा सणाच्या दिवशी जास्तच भरून येतं.

घरी असताना आम्ही एकत्र पूजा करायचो. सगळं आठवलं की डोळे भरून येतात. एकटी असते तेव्हा अश्रुंना वाट मोकळी करून देते, गुरूंशीही बोलते. यावेळी गुरू मला समजावतात. त्या म्हणतात, “तुझी, आई, वडील, बहीण, भाऊ मी आहे. तू सगळं काही माझ्यात बघ, मी तुला सगळं प्रेम देईन.”

हे सगळं समजून घेत, सगळ्याशी जुळवून घेत सेजल पुढे चालत राहिली आहे. ती सांगते, “आई-वडील हे आई-वडिलच राहतात. गुरूही तितकाच जीव लावतात. आईसारखंच सगळं काही विचारतात.” पुढे सेजल तृतीयपंथीयांमधल्या प्रथा, परंपरेविषयी सांगत असते.

ती म्हणते, “पुढे मला आमच्या गुरू-शिष्यांच्या परंपरेविषयी माझ्या गुरूंनी सांगितलं. त्यांनी नातेसंबंध सांगितले. गुरूभाऊ कोण, चेला कोण ? मोठ्यांना कसं बोलावं, तुम्ही जसं कोणी आल्यावर नमस्ते करता, तसं आमच्यात सलाम दुआ असते. हे सगळं मी शिकत गेले. यावेळी मला बऱ्याच अडचणीही आल्या.

गुरूंनी मला एकच शिकवलं, बाळा आपण किन्नर आहोत. सगळ्यांचं भलं करायचं. सर्वांना आशीर्वाद द्यायचा. सगळ्यांचा चांगलाच विचार करायचा. वाईट कधी बोलायचं नाही. कोणाकडून बोलून घ्यायचं नाही. हे सतत गुरू शिकवतात.

एक दिवस सेजलला बाहेर पडावं लागलं. भिक्षा मागण्यासाठी ती जात होती. भिक्षा मागताना कुणी चांगलं वागतं तर, कधी वाईट प्रसंगालाही तोंड द्यावं लागतं. लोक कसंही बोलतात. कोणी तुच्छ नजरेने बघतात. या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत आज इथंपर्यंत आले. हे सांगतानाच सेजलला अश्रू अनावर झाले.

तृतीयपंथीयात आली तरी सेजलला शिकायचं होतं. लहानपणापासूनच तिला शिक्षणाची आवड होती. सेजल सांगते, मी गुरूंना विचारलं की मी तृतीयपंथी आहे म्हणून मी शिकू शकत नाही का ? मला पुढे जायचं आहे. मला काम मिळालं नाही तरी मला चांगलं जीवन जगायचं आहे. मला तुम्ही शिकवाल का ? तेव्हा गुरूंनीही तिला शिकवायची तयारी दाखवली.

दहा वर्षांच्या सेजलला नांदेडमधील एका शाळेत दाखल केलं गेलं. सेजलने अभ्यासात चुणूक दाखवली आणि दहावीला ७२ तर बारावीला ८२ टक्के गुण तिने मिळवले. या प्रवासातही खूप अडचणी आल्याचं ती सांगते. शाळा, कॉलेजमध्ये आजूबाजूच्यांच्या नजरा चांगल्या नसायच्या. डबा खायलाही तिच्यासोबत कुणी बसायचं नाही.

सर, मॅडम सोबतचे सहकारी यांच्यामुळे खूप अडचणी आल्या. ते माझ्याशी असं का वागतात ? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. मला अजून पुढे जायचं होतं. पण, समाजाने मला स्वीकारलं नाही. त्यामुळे बी.कॉमपर्यंतचं शिकले. सेजल सांगत होती.ती म्हणते, काही लोक आम्हाला देव समजतात तर, काहीजण तुच्छ लेखतात. लोकांनी आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. आमचा समाज आता पुढे येत आहे.

आमच्या समाजातील काही लोक इतर समाजाचेही कल्याण करत आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्ही अन्नदान केलं. आम्ही चांगलं काम केलं. समाजाला काय वाटतं माहीत नाही. यात प्रतिसाद देणारे पण होते, न देणारे पण होते. किन्नर असून ही समाजात आपलं नाव व्हावं असं स्वप्न होतं असं सेजल सांगते.

एक दिवस मी माझ्या गुरूंसोबत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरूंना विचारले, तुमच्याकडे कुणी शिक्षण घेतलेलं आहे का ? तेव्हा गुरूंनी सांगितले हो म्हणून. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर म्हणाले, 'तुम भीख क्यों मांगते हो ? तुमको रोजगार दिया तो कर सकोगे ?, असं त्यांनी विचारताच सेजलने होकार दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या प्रश्नाने सेजलचं आयुष्यच बदलून गेलं.

त्यांनीही 'आपले सरकार सेवा केंद्र' (सेतू सुविधा केंद्र) चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. यात कमल फाऊंडेशनची खूप मदत झाली. त्यांनी पुढाकार घेऊन यासाठी जे काही कागदपत्रं लागतात त्याची पूर्तता करून घेतली. अखेर तो आनंदाचा क्षण येऊन ठेपला. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी 'आपले सरकार सेवा केंद्र' जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सेजलला प्रदान केलं.

माध्यमांमधून ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आई-पप्पांनाही मिडीयातूनच कळलं. तोवर मी कधीच त्यांच्याशी संपर्क केला नाही. त्यांचा नंबरही माझ्याकडे नव्हता. त्यांनी माझा मोबाईल नंबर मिळवला आणि पप्पांनी मला फोन केला. माझी विचारपूस केली. मी त्यांना सगळं सांगितलं. यावेळी त्यांच्या फोनमुळे माझं मन भरून आलं होतं. मी जिंकले असं सारखं वाटत होतं.

मी अशी राहूनही आई-वडिलांचं नाव कमवलं. असं सेजल म्हणाली. 'आपले सरकार सेतू केंद्र' चालवताना सुरुवातीला अडचणी आल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सोलापूरे मॅडम यांची वेळोवेळी मदत घेतली. पंधरा दिवसांत बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी ज्या पद्धतीने वावरतात त्याच पद्धतीने मी वावरते. त्यांचेच स्वच्छतागृह मी वापरते.

या ठिकाणच्या महिला कर्मचाऱ्यांचा मला पाठिंबा मिळतो. माझ्याकडे त्या स्त्री भावनेतून पाहतात. तेव्हा खूप चांगलं वाटतं असे सांगण्यासही सेजल विसरत नाही. सेजल म्हणते, “आपले सरकार सेतू केंद्र' मिळाल्याने माझं आयुष्यच बदललं आहे. मी एक तृतीयपंथीय आहे. ते माझं आयुष्य मला जगावंच लागेल. ते मी जगत आहेच. पण, दुसरं हे जे आयुष्य नव्याने मिळालेल्या जबाबदारीचं आहे तेही उत्तम जगणार आहे. शिक्षण घेतल्यामुळे माझा फायदा झाला.”

आमचा दिनक्रम सकाळी सहाला सुरू होतो. इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांना आशीर्वाद देतो. हे काम सुरूच ठेवूनच सेतू केंद्राला वेळ देणार आहे. समाजाला मी सोडू शकत नाही. या लोकांमुळेच मी आज उभी आहे. सकाळी भिक्षा मागून मी सेवा केंद्रात येते. आता पहिल्या सारखं आयुष्य राहिलं नाही.

आता मी 'सेलिब्रिटी' झाले आहे. कधी लोक मला कार्यक्रमासाठी त्यांच्या गाडीतून घेऊन जातात. सगळे जण चांगले बोलतात. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोक सेवा केंद्राला, घरी येऊन भेट देत आहेत. आम्ही पण, तुमच्या सारखेच माणूस आहोत. इतर स्त्री पुरुषांप्रमाणेच आम्हाला सन्मान द्या आणि घ्या, एवढीच अपेक्षा सेजल समाजाकडे व्यक्त करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT