sharvari jamenis sakal
लाइफस्टाइल

पालकत्वाचा ‘ताल’

आईपणाची मला चाहूल लागली, तेव्हा मला ऑस्ट्रेलियातल्या एका टूरची संधी आली होती आणि तेव्हा मी त्यांना हो म्हटलं होतं. जेव्हा मला समजलं की, मी प्रेग्नंट आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलं.

सकाळ वृत्तसेवा

- शर्वरी जमेनिस

आईपणाची मला चाहूल लागली, तेव्हा मला ऑस्ट्रेलियातल्या एका टूरची संधी आली होती आणि तेव्हा मी त्यांना हो म्हटलं होतं. जेव्हा मला समजलं की, मी प्रेग्नंट आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की माझं बाळ चार महिन्यांचं असतानाच मला ही टूर करायला लागणार आहे आणि ते मला खरंच शक्य होणार आहे का?

कारण, मी जवळजवळ सहाव्या महिन्यापर्यंत प्रेग्नंट असतानासुद्धा नृत्य व विविध कार्यक्रम करत होते; पण सातव्या महिन्यानंतर पायात घुंगरू बांधलेले नव्हते; पण मुलींना नृत्य शिकवत होते, योगासनं करत होते. ऑस्ट्रेलियात मला दीड तासाचे तीन परफॉर्मन्स करायचे होते. त्यामुळे आई झाल्यानंतर गेलेली सगळी एनर्जी परत येऊ शकेल का?, आणि दीड तास आपण उभे राहू शकू का?, हे माझ्यासाठी एक मोठं आव्हानच होतं. 

डॉक्टर आणि आईनं मला पाठिंबा दिला अन् सांगितलं, की ऑस्ट्रेलियाचा प्रोग्रॅम रद्द करू नकोस, कारण त्यानिमित्ताने का होईना, तू लवकर यातून बाहेर पडशील आणि पुन्हा एकदा करिअरला लागशील. मी हा प्रोग्रॅम रद्द करणारच नव्हते. कारण माझी न्यूज कळली तोपर्यंत तिकीटविक्री झालेली होती. माझ्यासाठी दुसरा कलाकार येईल का?, हे म्हणणंही व्यावहारिक वाटत नव्हतं. मात्र, डिलिव्हरी होत नव्हती, तोपर्यंत मी पुढचा विचार करूच शकत नव्हते. त्यामुळे बाळ पोटात असताना मी आनंदी आणि शांत राहिले. त्यावेळी नृत्याचे अनेक कार्यक्रम बघितले.

सीझर झाल्यानंतर मी आईकडे राहिले.  बाळ तीन महिन्यांचं झाल्यानंतर मी माझ्या घरी आले. त्यानंतर बाळाला खेळवत-खेळवत रियाझ सुरू केला. बाळ चार महिन्यांचं असताना त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायचं की नाही हा प्रश्न होता. त्याला दूधही सुरू होतं; पण हा प्रश्नही निकाली निघाला. कारण त्याला बाहेरचं दूध खूपच आवडलं. मग दुधाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं होतं. त्यावेळी मला आईनं बाळाला ऑस्ट्रेलियाला नेण्यास नकार दिला.

माझी बहीण आणि आई बाळासाठी झटत होत्या. त्यांच्यामुळेच मी ऑस्ट्रेलियात जाऊन तीन परफॉर्मन्स करून आले. मात्र, ऑस्ट्रेलियात जाताना मला खूपच वाईट वाटत होतं. मी स्वतःला स्वार्थी समजत होते. अशा परिस्थितीत माझ्या तीनही कार्यक्रमांना रसिकांनी उभे राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तेव्हा एक कलाकार म्हणून खूप समाधान मिळालं. मी परत आले, त्यावेळी मला माझा मुलगा शर्विलची खूप ओढ लागली, त्याच्याबद्दल खूप प्रेम वाढलं होतं.

मी चित्रपटांमध्ये अभिनय करते; पण माझं दुसरं प्रोफेशन कथक नृत्य हे असून, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नृत्य किंवा क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या महिला प्रेग्नंट असतात, त्यावेळी त्यांना खूप बंधनं असतात. त्या काळात खेळाडू खेळू शकत नाही आणि नृत्यकलाकार नृत्य करू शकत नाही.

आई होण्याचा निर्णय मी घेतला होता, त्यामुळे मला या सर्व गोष्टी मॅनेजच कराव्या लागणार होत्या. मी प्रेग्नंट असताना नृत्य करता येत नसले, तरी नृत्याबाबतचा वैचारिक आणि पुढचा विचार माझ्या मनात रुजत होता. चांगली पुस्तकंही वाचली. त्यातून माझ्या नृत्याच्या करिअरबाबत खूप चांगल्या गोष्टी विचारात येऊ लागल्या. गर्भातील बाळावरही चांगले संस्कार झाले आणि नृत्यकलाकार म्हणून मीही समृद्ध होत गेले.

मुलामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींवर प्रभुत्व मिळवायला मी शिकले. मुलाला पाहणं, घर सांभाळणं, कुटुंबाला वेळ देणं, मुलींना नृत्य शिकवणं आणि नृत्याचे कार्यक्रम करणं या गोष्टी मी अगदी आरामात करू लागले. त्यावेळी माझे पती, तबलावादक निखिल फाटक आणि कुटुंबीयांनी मला खूप पाठिंबा दिला. मी मुलाबरोबर कधी खोटे बोलले नाही. उलट माझ्या करिअरच्या बाबतीतील गोष्टी त्याला सांगितल्या. करिअर करत असले तरी त्यालाही क्वालिटी टाइम देत होते. तो बरोबर येऊ शकेल अशाच ठिकाणी गेले. त्याच्यावर अन्याय होईल, अशी कुठलीही गोष्ट केली नाही.

एकदा मी नृत्य करत असताना त्याने माझे पाय पकडून ठेवले. मी त्याला म्हणाले, ‘माझं नृत्य चांगलं झालं नाही तर लोक टाळ्या वाजवणार नाहीत.’ त्यानंतर त्यानं लगेच पाय सोडले आणि म्हणाला, ‘आई तू चांगलं नृत्य कर, म्हणजे लोक टाळ्या वाजवतील.’’ या गोष्टीनंतर मी नृत्य करते, याचा त्याला खूप अभिमान वाटू लागला.

प्रेग्नंट झाल्यानंतर माझं पहिलं वर्ष ॲडजस्टमेंट करण्यात गेलं. कारण बाळ मला समजून घेत होतं आणि मीही त्याला नव्याने समजून घेत होते. मी आणि माझ्या नवऱ्यानं त्याची दररोजची हालचाल आणि होणारी वाढ खूप एन्जॉय केली.

आम्ही नोकरीला नसल्यामुळे आम्हाला कोणतीही बंधनं नव्हती. बाळ झोपलं की आम्ही रियाझ करायचो आणि बाळ उठलं की पूर्ण वेळ त्याच्याशी घालवायचो. त्यामुळे मी नृत्यात वंदनीय झाले आणि माझ्यात समर्पणाची भावना निर्माण झाली. त्यामुळे माझं नृत्य खूप समृद्ध आणि सुंदर होत गेलं, अशा भावना रसिकांनीच व्यक्त केल्या.

माझा मुलगा आता ११ वर्षांचा आहे. आता तो पाच ते सहा तास बसून ओरिगामीची अत्यंत उत्कृष्ट मॉडेल्स बनवतो. माझं मातृत्व म्हणजे अपार आनंद देणारं आहे. मी गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये नृत्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यानंच मला फोन करून सांगितलं, की ‘आई, मी खूप छान आहे. माझा अजिबात विचार करू नकोस. तू छान नृत्य कर.’ खरंतर ही खूप गोड गोष्ट आहे.

कारण त्याला माहीत आहे, की आपले विचार आईच्या मनात येऊ शकतात; पण त्यानं समंजसपणे मला हे सर्व सांगितलं. मी रंगमंचावर जाते, त्यावेळी सर्व विचार सोडून नृत्यात तल्लीन होते. आपण चांगले वागलो, तर आपली मुलंही चांगली वागतील, हा विचार घेऊनच आम्ही दोघं त्याचा सांभाळ करत आहोत.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

  • आजकाल करिअरच्या मागं खूप लोक धावतात. त्यांना मूल नको असतं. त्यांना मी सांगू इच्छिते, की तुम्हाला आता ते क्षण त्रासदायक वाटतील. मात्र, त्यानंतर मुलाच्या प्रत्येक गोष्टीमुळे तुम्ही आनंदी व्हाल.

  • सगळ्या गोष्टी निभावता येतात. फक्त चांगला वेळ मुलाला द्या. त्याचबरोबर तुमचे करिअर आणि तुम्हालाही वेळ द्या.

  • मी नृत्यासाठी पाच-सहा तास जाते, तेव्हा माझा मुलगा कुठलीही तक्रार करत नाही. कारण, त्याला माहीत आहे, की आई आनंदी होणार आहे. उलट, मला नाही नृत्य करायचं, असं मी म्हणाले तर तो माझ्यावर रागावतो. 

  • आईपणामुळे खूप सुंदर वर्षं जातात. तुम्ही एक व्यक्ती म्हणून घडता. आईपणाकडे बंधन म्हणून पाहू नका. बाळ मोठं होते, त्याचं आयुष्य आकार घेते, तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं. आपल्याकडून चांगली कलाकृती घडली याचे समाधान शब्दांत सांगता येत नाही.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 'एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद'; उत्पन्नाच्या निकषाची पडताळणीचे नवीन अपडेट..

School Kids Drug Abuse : एसपीसाहेब हुपरी पोलिस ठाणे परिसरात काय सुरूय बघा, शाळकरी मुलांनी नशेसाठी थेट लाकूड चिकटवण्याच्या द्रव्याचा केला वापर

Monsoon Update: मुंबई, ठाण्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला, राज्यातील 'या' भागांत अलर्ट जारी, पुढील २४ तासांत कसे असेल हवामान?

Jaljeevan Mission: ठेकेदारांची १२ हजार कोटींची देणी द्यावी; जलजीवन मिशन संघटनेची बैठक, अन्यथा आंदोलनचा इशारा

Transport Scam : निरीक्षकावरील कारवाईसाठी अहवालाचा ‘मुहूर्त’, परिवहनमंत्र्यांचा इशारा; आज मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर होणार

SCROLL FOR NEXT