इंजिनप्रमाणेच टायर हा वाहनांचा अविभाज्य घटक. त्यांची नियमित देखभाल ठेवणे आपले आद्य कर्तव्य. सध्या पावसाळ्यात खड्डेयुक्त रस्त्यांचा सर्वांनाच सामना करावा लागतो. अचानक आलेला खड्डा चुकवण्याच्या नादातही अंदाज चुकल्याने वाहने खड्ड्यात आदळतात. अशा वेळी चाकांची अलाईनमेंट, बॅलेन्सिंग बिघडण्याची शक्यता असते. वाहने चालवताना एकाच बाजूला खेचले जाणे, चाकाची एका बाजूने अधिक झिज होणे, ही त्याची लक्षणे. चाकांकडे दुर्लक्ष केल्याने नेमक्या काय समस्या उद्भवू शकतात, याचा आढावा...
1) क्षमतेपेक्षा अधिक हवा
क्षमतेपेक्षा अधिक हवा चाकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवू शकते. जास्त हवेमुळे टायरला रस्त्याशी संपर्क साधणे आणि पकड बसवणे कठीण होते. परिणामी अतिवेगात असताना टायर फुटणे, चाकाची रचना बिघडणे आदी समस्या उद्भवतात. चाकाचा मधील भाग अधिक फुगीर दिसल्यास वातावरणानुसार त्यातील हवा कमी-अधिक करणे सुरक्षित प्रवासासाठी उपयुक्त ठरते.
2) क्षमतेपेक्षा कमी हवा
जगभरातील संशोधन सांगते, रस्त्यावरील ६० टक्के वाहनांमध्ये निर्देशित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी हवा असते. चाकांमध्ये हवाच कमी असल्यास वाहन चालवत असताना अचानक नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. वाहनाची हाताळणी करणे अवघड होणे, चाकाची अधिक झिज होणे, पंक्चर आदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे दर १५ दिवसांनी हवा तपासावी.
3) तडा जाणे आणि फुगवटा येणे
खड्डे, दगडी रस्ते किंवा चांगल्या रस्त्यात मध्येच एखादा दगड आल्यास किंवा उन्हाळ्यात चाकाला तडे जातात. तडा गेल्यास, चाकावर मध्येच फुगवटा आल्यास दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. चाकाची एक बाजू फाटली असल्यास अपघाताला निमंत्रण मिळते. चाकाला तडे जाणे, ते बदलणे सूचित करते. त्यामुळे दर १५ दिवसांनी चाकांची तपासणी करावी.
4) अतिवेगात वाहन चालवणे
अतिवेगात वाहन चालवल्याने चाकाचे आयुर्मान कमी होते. यामुळे चाक कमी वेळेत खराब होण्याची, त्यांची झिज होण्याची शक्यता अधिक असते. अतिवेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. महामार्गावर वाहन अतिवेगात असल्यास चाक लवकर गरम होते. रस्ता ओला असताना किंवा साचलेल्या पाण्यातून वेगात वाहन चालवूच नये.
5) चुकीचे संरेखन
चाकाची एका बाजूनेच किंवा चार पैकी एकाच चाकाची तुलनेने अधिक झिज झाली असल्यास चाकाचे संरेखन बिघडलेले असते. खड्ड्यात आदळल्याने किंवा खडबडीत रस्त्यांमुळेही वाहनाचे संरेखन बिघडते. त्यामुळे महिन्यातून एकदा संरेखनाची तपासणी करणे आवश्यक ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.