- प्रियदर्शिनी इंदलकर
मला नेहमी मुलाखतींमध्ये प्रश्न विचारला जातो, की तुझा छंद काय आहे? पण माझ्या व्हिडीओ एडिटिंग या छंदाबद्दल आज मी पहिल्यांदाच बोलतेय. कोणतीही फुटेजेस घेऊन ते जोडून त्यातून काहीतरी अर्थपूर्ण बनवणं हे मला लहानपणापासूनच आवडतं. आता रील्सही मी स्वतः एडिट करते, माझ्या सहकाऱ्यांनाही काही वेळा त्यांचे रील्स एडिट करून देते.
एडिटिंगची आवड मला लहानपणापासूनच होती. घरात कॅमेरा होता. मी त्या कॅमेऱ्यातून माझ्या खेळण्यांना सजवून त्यांचं शूटिंग करायचं, त्याच्या मागे डबिंग करून काहीतरी एक सीन तयार करायचा आणि ते जोडायचं हा माझा फावल्या वेळातला उद्योग असायचा.
तेव्हापासून मला एडिट करायला आवडू लागलं. त्यानंतर मग मी कोणाचा वाढदिवस असेल, काही कार्यक्रम असेल तर त्या वेळी फोटोज घेऊन ते जोडून त्यांचे व्हिडीओ तयार करू लागले. त्यामध्ये गाणी, वेगवेगळे पॅटर्न ट्राय करू लागले.
मग त्यातून शिकत गेले. त्यासाठी मी चांगल्या कंपनीचा फोनही खरेदी केला, जेणेकरून मला जे काही दिसेल, ते शूट करून, एडिट करून मी त्यातून काहीतरी नवीन तयार करू शकेन. मला जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा हे एडिटिंग मी करत असते.
लॉकडाऊनच्या काळात माझ्या वडिलांच्या पन्नाशीचा कार्यक्रम होता. त्यावेळी मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना फोन केले आणि त्यांच्याकडून माझ्या वडिलांबद्दल बोलतानाचे व्हिडीओ मागवून घेतले आणि ते एडिट करून मी एक तासा-दीड तासाची छोटी फिल्म तयार केली होती.
मी तसं काही शिक्षण घेतलेलं नाही. जे काही शिकले ते करत करतच शिकले. पहिल्यापासूनच माझ्या घरी कॉम्प्यूटर होता, त्याच्या मदतीने मुव्ही मेकर वापरून मी काम करायला सुरुवात केली.
माझा भाऊ वरुण इंदलकर तो ॲनिमेशन क्षेत्रात काम करतो, त्यालाही याची आवड होती. तो मला अधूनमधून मार्गदर्शन करायचा. काही चुकलं तर सांगायचा, नवीन फिचर्स शिकवायचा. आजही मला जर कोणी काही एडिटिंग करायला सांगितलं तर मला खूप आवडतं आणि मी ते करत बसते.
लहानपणी अनेकदा मी शाळेतून घरी आले की एकटी असायचे. एकुलती एक मुलगी असल्याने मला स्वतःसोबत खूप वेळ घालवता यायचा. त्यामुळे माझ्या आवडीच्या सगळ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी मला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची गरज पडत नाही.
त्या वेळी फिल्म्स, टीव्ही पाहत मला वाटू लागलं की हे आपणही करू शकतो.त्यातूनच मग हे एडिटिंग करावं हे सुचलं आणि मी करत गेले. सध्या कामाच्या व्यापात मला रील्स एडिट करणे वगैरे एवढंच जमतं. फार मोठी एडिटिंगची कामे जमत नाही.
पण २०२१ मध्ये मी एका देशपातळीवरच्या शॉर्टफिल्मच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा मी घरीच, घरच्यांचे फोन वापरून, वेगवेगळे शॉट्स घेऊन एक शॉर्ट फिल्म तयार केली होती. त्याचं म्युझिकही मीच केलं होतं. फॉली वगैरे वापरलं होतं. त्यानंतर मात्र पूर्ण वेळ काही करायला जमलं नाही, पण मला नक्कीच नवीन काही तरी करायला आवडेल.
सिनेमा हे माध्यम एडिटिंगचं आहे, असं मला वाटतं. ज्या दिग्दर्शकाला एडिटिंग चपखल माहित असतं तो आपल्या टीमकडून, अभिनेत्यांकडून चांगलं काम करून घेऊ शकतो. एडिटिंग ही गोष्ट भविष्यात अभिनेत्री म्हणूनही मला उपयोगी पडणार आहे.
मला कळेल की माझा सीन कुठे एडिट होणार आहे, कुठे कशा पद्धतीचं काम अपेक्षित आहे. त्यामुळे मी माझ्यात खूप सुधारणा करू शकते. थेट कोणत्या प्रोजेक्टचं एडिटिंग करेन की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण भविष्यात जर कधी दिग्दर्शनात उतरावं असं वाटलं, तर या एडिटिंगच्या आवडीचा मला नक्कीच फायदा होईल.
(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.