Actress Rupali Bhosale Sakal
लाइफस्टाइल

रांधू आनंदे

स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे. मला ते मनापासून आवडतं. माझ्या आईचं नेहमी असं म्हणणं असायचं, की तुम्हाला थोडाफार स्वयंपाक तरी यायलाच हवा.

रुपाली भोसले, अभिनेत्री

स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे. मला ते मनापासून आवडतं. माझ्या आईचं नेहमी असं म्हणणं असायचं, की तुम्हाला थोडाफार स्वयंपाक तरी यायलाच हवा. उद्या समजा, आई-बाबा घरी नसतील तर तुझी खाण्याची आबाळ नको. माझ्या घरात माझी आई, भाऊ, वडील कोणालाही बाहेरचं खाणं तितकंसं आवडत नाही. वरचेवर आम्ही हॉटेलला जात नाही.

शक्यतो आम्ही घरीच सगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो. माझी आई आणि मी एकमेकींना सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या रेसिपी पाठवत असतो आणि आम्ही त्या बनवूनही पाहतो. आईचं कायम हेच म्हणणं असायचं की तुम्हाला स्वयंपाक आलाच पाहिजे. आईचा आग्रह असायचा, की गोळा घेऊन गोल पोळी तर लाटता येईलच; पण तुम्हाला घडीची पोळीही गोल लाटता यायला हवी. तीच खरी सुगरण. तेव्हा मी आठवीत होते आणि तेव्हापासूनच स्वयंपाकाची आवड मला लागली.

सुट्ट्यांमध्ये गावी किंवा मामाकडे जाण्याऐवजी मी घडीची पोळी कशी लाटायची, ती हातानं कशी शेकायची आणि पलटायची हे शिकणं सुरू झालं. भात लावताना तांदळात पाणी किती टाकायचं, हे बोटानं मोजायला मी तेव्हाच शिकले होते; पण आता इतका सराव झाला आहे की, या मोजमापाची आता गरज पडत नाही. आईनं मला पदार्थाची चव हातावर घेऊन चाखून पाहायची, हे कधीच सांगितलं नाही.

तिचं म्हणणं असायचं, की फक्त वासानं चव कळायला हवी, मीठ किती घातलंय हे कळायला हवं. आता ती सवय अंगवळणी पडली आहे. तिच्या शिकवणीमुळे मला आज मोदकापासून पुरणपोळीपर्यंत अगदी सगळा स्वयंपाक उत्तम जमतो. स्वयंपाक हे फक्त बाईचं क्षेत्र आता राहिलेलं नाही.

पुरुषानं स्वयंपाक करणं ही खूप विशेष बाब आहे, असं मला तरी आज वाटत नाही. कारण मी ज्या परिवारात लहानाची मोठी झाले, तिथल्या सगळ्या पुरुषांना स्वयंपाक जमतो. माझे आजोबा आता हयात नाहीत; पण ते उत्तम स्वयंपाक करायचे. माझे काकाही हौशी आहेत, ते सगळ्या बायकांना सुट्टी देऊन स्वतः स्वयंपाक करणारे आहेत. हे सगळं मी लहानपणापासून पाहत आले आहे.

माझ्या घरात कधीही कोणालाही मूड आला, की स्वयंपाक करतात. ही गोष्ट मी लहानपणापासून पाहत आलेय. या सगळ्यामुळे आज मी अशी घडले आहे. सध्या मी शूटिंग ज्या भागात आहे, तिथे शिफ्ट झाले आहे. आई कधीकधी माझ्यासोबत असते, कधी नसते. ती नसते, तेव्हा मी स्वतःसाठी, भावासाठी पूर्ण स्वयंपाक करते आणि माझ्यासोबत सेटवरही नेते. फक्त चपात्या मी शूटिंगच्या सेटवर घेऊन जात नाही.

त्याऐवजी मी कणीक, पीठ, तवा, पोळपाट लाटणं, सगळं काही सेटवर नेते आणि सेटवरच्या किचनमध्ये मी चपात्या करते. कारण मला असं वाटतं, की आपण पोटासाठी बारा-चौदा तास काम करतो, त्यामुळे गरमागरम चपात्या खायला मिळाव्यात. दोन घास जास्त जातात आणि मजाही येते.

मला वेळ मिळत नाही, अशी तक्रार आपण सतत करतो; पण खरंतर हा वेळ काढावा लागतो आणि काम आवडीचं असेल तर तो जरूर निघतो. मी आत्ता जी भूमिका करतेय ‘संजना’, त्या पात्राला काही फारसा स्वयंपाक येत नाही; पण माझ्या चाहत्यांनी मला ‘बिगबॉस’मध्ये पाहिलं आहे, माझं युट्यूब चॅनेल पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे, की मला व्यवस्थित स्वयंपाक जमतो.

गावी गेल्यावर चुलीवर स्वयंपाक करायलाही जमतो. तिकडच्या लोकांना वाटतं की, ही शहरात राहते, हिला जमणार नाही; पण ते मला चुलीवर स्वयंपाक करताना पाहतात, तेव्हा त्यांनाही माझं कौतुक वाटतं. किचन हा माझा कम्फर्ट झोन आहे.

मी किचनमध्ये जास्त रमते, सतत काहीतरी करत राहते. मी रेसिपीचं युट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे. मी त्यावर विविध पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट करत असते. कारण त्यामध्ये फार वेळ जातो.

फक्त शूट करून व्हिडिओ अपलोड करणं एवढंच नसतं, त्याचं एडिटिंग वगैरे करणं बरंच वेळखाऊ काम आहे. त्यामुळे सध्या मला त्यासाठी फारसा वेळ मिळत नाही; पण स्वयंपाक ही माझ्यासाठी एक साधना आहे, मेडिटेशन आहे. नवनिर्मिती असल्याने मला मजा येते.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता

U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Loha election result : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का! लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपचे एकाच कुटुंबातील सहा जण पराभूत!

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

Latest Marathi News Live Update: २६ नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक

SCROLL FOR NEXT