मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा हा बहुतांश शहरी आणि निमशहरी असला तरी कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे माहेरघर असलेला नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघदेखील शेवटच्या टप्प्यात (ता.२० मे) मतदानाला सामोरा जात आहे. या पाचव्या टप्प्यातील तेरापैकी ११ जागा महायुतीकडे असल्या तरी महाविकास आघाडीने या टप्प्यात महायुतीसमोर सर्वच जागांवर महाआव्हान उभे केले असल्याने महायुतीचा कस लागणार आहे.
शेवटच्या टप्प्यासाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ठाण मांडले होते, तर ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मात्र शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात यावे, यासाठी आघाडीने प्रयत्न केले होते. महायुतीचा शेवटचा टप्पा नरेंद्र मोदी यांच्या सभा आणि रोड शोमुळे रंगला. तर महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अवलंबून राहिली.
पाचव्या टप्प्यासाठी व अखेरीस मतदान असल्याने उमेदवारी जाहीर करण्याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वीपर्यंत अनेक जागांवरील सस्पेन्स कायम होता. नाशिक, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मध्य मुंबईसारख्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना विशेषत: महायुतीमध्ये जागावाटपावरुन सुंदोपसुंदी सुरू होती. तर महाविकास आघाडीमध्ये देखील धुळे, दिंडोरी, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांवर पक्षांतर्गत आणि आघाडीअंतर्गतसुध्दा नाराजीनाट्य घडलेले होते.
महायुतीतील नाराजीचा फायदा
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रचाराच्या उत्तरार्धात महाविकास आघाडीच्या बाजूने कल झुकलेला दिसू लागला आहे. आठवडाभरापूर्वी नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभेनंतर उत्तर महाराष्ट्रातील चित्र बदलू लागले आहे. दिंडोरी ही राखीव जागा आहे. माकपचे माजी आमदार जे. पी. गावितांनी उमेदवार मागे घेतल्यानंतर दिंडोरीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली आहे. महायुतीच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कांदा उत्पादकांची नाराजी भोवण्याची शक्यता आहे. शिवाय याच मतदारसंघामध्ये महायुतीसोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ भगरे यांच्या प्रचारसभेत गेल्याने ही नाराजी उघड झाली आहे. द्राक्ष व कांदा उत्पादकांच्या प्रश्नांनी भारती पवार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) विरुध्द शिवसेना (ठाकरे गट) असा सामना आहे. मात्र शांतिगिरी महाराज देखील रिंगणात असल्याने हा तिरंगी सामना होणार आहे. नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे गोडसेंना मदत करत नसल्याची चर्चा आहे. भुजबळ स्वत: उमेदवारीसाठी उत्सुक होते. मात्र त्यांना उमेदवारीसाठी विविध कारणे सांगून लटकवून ठेवल्याने त्यांनी स्वतःच माघार घेतल्याची घोषणा केली.
आजच महायुतीचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे भुजबळ यांना भेटायला गेले होते. भुजबळांची नाराजी मिटविण्यासाठीच ही भेट होती, अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला या नाराजीनाट्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नाशिकमध्ये सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी त्यामुळेच प्रचारात आघाडी घेतली आहे. धुळ्यात भाजपचे वि खासदार सुभाष भामरे व कॉँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात लढत आहे. तिथे भामरेंची स्थिती चांगली मानली जाते.
शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कल्याण आणि ठाणे मतदारसंघांसाठी अपेक्षेप्रमाणे चुरस अखेरीपर्यंत जमून आली नाही. कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे कल्याणकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी शिंदे यांनी कल्याणमध्ये मोर्चेबांधणी करुन ही प्रतिष्ठेची लढत केली. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार वैशाली दरेकर - राणे यांना पक्षसंघटनेचे पुरेसे बळ मिळालेले नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गटाने मोठी जमवाजमव केली. मुंबईतून ठाण्यामध्ये स्थलांतरीत झालेला जुना शिवसैनिक या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला बळ दिले. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांच्या बळावर शिंदेंसमोर आव्हान उभे केले आहे. पालघरमध्ये मविआच्या भारती कामडी व भाजपच्या हेमंत सावरा यांच्यात लढत आहे.तर भिवंडीत कपिल पाटील व सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत आहे.
शिवसेनेसाठी असेल अंतिम निकाल
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा निकाल हा शिवसेनेच्या फुटीवरचा अंतिम निकाल असणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणून स्ट्राईक रेट शंभर टक्के ठेवण्याकडे कल आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे, तर शिवसेनेकडे मुंबईत खाली कार्यकर्त्यांची वाणवा असल्याने भाजपच्या बळावरच प्रचार ओढून न्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवत आहे. या चारही जागांपैकी तीन जागांवर धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत आहे. शिवसेनेने आ. यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून आणि कारावासाच्या भितीने शिंदे गटात आलो असे बेधडक सांगणारे आ. रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळवून देण्यात शिंदे यांना यश मिळाले. तिथे उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांच्यारूपाने चांगले आव्हान दिले आहे. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समोर शिंदे यांचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी आव्हान उभे केले होते. मात्र काँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना यशस्वी ठरल्याचे दिसते.
अनिल देसाई यांनी दादर, माहिम, माटुंगा, अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर धारावीमधून राहुल शेवाळेंनी आघाडी घेतली आहे. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याविरोधात भाजपने विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम आणि दलित मतदारांच्या बळावर वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे. मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल व कॉँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होत आहे. तर ईशान्य मुंबईत भाजपचे मिहिर कोटेचा व ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांच्यात चुरशीचा सामना होत आहे.
अशी आहे मुंबईतील लढाई...
मुंबईच्या या सहाही मतदारसंघांत दलित, मुस्लिमवर्गासोबत उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, झोपडपट्टीतील निवासी अशा सर्व वर्गांचा समावेश आहे. कुठे ही लढाई टॉवर विरुद्ध चाळ तर कुठे झोपडपट्टी विरुद्ध टॉवर अशी आहे. कुठे ही लढाई हाताला रोजगार, सेवा उद्योग यासाठी आहे, तर कुठे नळाच्या पाण्यासाठी आणि रस्त्यांवरचे खड्डे मिटावेत, यासाठीदेखील आहे. तर कुठे डोक्याला छप्पर मिळावे यासाठी आहे, तर कुठे डोक्यावर होर्डिंग पडू नये, यासाठीदेखील या निवडणुकीतून उत्तर मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.