Devendra Fadnavis Narendra Modi
Devendra Fadnavis Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

70 वर्षांत जेवढे रस्ते झाले नाहीत, तेवढे नॅशनल हायवे नरेंद्र मोदींच्या काळात झाले - देवेंद्र फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

'मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील मानेंना लोकसभेवर पाठवावेच लागेल.’

इस्लामपूर : जे तीस वर्षे मंत्री होते, त्यांच्या काळात मतदारसंघात विकासासाठी म्हणावा तेवढा निधी आला नाही. महायुतीचेच शासन यावे लागले. ज्यांना सत्ता मिरवायची असते, सत्ता राबवायची असते, त्यांना सामान्यांशी देणे-घेणे नसते, अशी टीका जयंत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केली.

हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारासाठी गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार संजय पाटील, अनिल बोंडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, पृथ्वीराज देशमुख, सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे प्रमुख उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरणारी आहे. विरोधकांकडे एकमुखी नेतृत्व नाही. प्रत्येकाला घराणेशाही पुढे न्यायची आहे. विरोधकांच्या रेल्वेला इंजिन नाही, बोगीच आहेत. राहुल गांधींच्या बोगीत सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनाच जागा आहे. शरद पवारांच्या बोगीत सुप्रिया सुळे, तर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बोगीत आदित्य ठाकरेंना जागा आहे. इतर कुणालाही जागा नाही. इंडिया आघाडीला अनेक ड्रायव्हर असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या दिशेला ओढत आहेत.

सामान्यांच्या विकासाचे त्यांना देणे-घेणे नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथावर गेला. त्यांनी देशाचा विचार केला. वर्षाला एक पंतप्रधान करणार आहेत. त्यांचे राजकारण संगीतखुर्चीचा खेळ आहे. भारत देश कोणाची खासगी मालमत्ता नाही. विरोधकांत एकमत नसल्याने सामान्य लोकांची काळजी घेणारे सरकार केंद्रात येणे आवश्यक आहे. राज्य व देशात भरघोस विकास पाहिजे असेल तर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आपल्याला निवडून आणावे लागेल.’

ते म्हणाले, ‘७० वर्षांत जेवढे रस्ते झाले नाहीत. तेवढे नॅशनल हायवे नरेंद्र मोदींच्या काळात झाले. दहा वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले. ५० कोटी घरांत गॅस कनेक्शन दिले. ६० कोटी लोकांना घराघरांत शुद्ध पिण्याचे पाणी दिले. ८० कोटी लोकांना मोफत रेशन धान्य दिले. ६० कोटी लोकांना विनातारण मुद्रा लोन दिले. १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवले. बचतगटांकडून उत्पादित माल रेल्वे स्टेशन, बसस्थानक व मॉलमध्ये विकला जाणार आहे. प्रत्येक बॅंकेला अनुसूचित घटकातील उद्योजक बनवण्यासाठी सक्ती केली आहे. कारागिरांना विश्‍वकर्मासारखी योजना देशपातळीवर राबवली.

साखर कारखान्यांचा दहा हजार कोटी इन्कमटॅक्स माफ करण्यात आला. केंद्राने इथेनॉल उत्पादनाचा निर्णय घेतल्यामुळे कारखानदारी टिकली. सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये दिले. कोरोना काळात मोफत लस दिली. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील मानेंना लोकसभेवर पाठवावेच लागेल.’

Devendra Fadnavis Islampur bjp sabha

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘हातकणंगले मतदारसंघात चार नवीन एमआयडीसींना मंजुरी दिली आहे. वाळवा तालुक्यात आष्टा येथे एक एमआयडीसी असेल. माने खासदार झाल्यानंतर नवनवीन उद्योग आणून स्थानिकांना रोजगार देऊ.’ यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रम पाटील यांची भाषणे झाली.

गटबाजीची धुसफूस कायम

इस्लामपूर मतदारसंघात सुरू असलेले गटबाजीचे प्रदर्शन आजच्या सभेतही फडणवीसांना पाहायला मिळाले. माजी मंत्री सदाभाऊ खोत व निशिकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन नेत्यांना ‘आगे बढो’च्या घोषणा दिल्या. भाषणांदरम्यान ते सुरूच होते. लोकसभा निवडणूक पाच दिवसांवर आली, तरी गटबाजी संपली नसल्याने स्थानिकांना लोकसभेचे नाही, तर विधानसभेत रस असल्याचे स्पष्ट झाले. ‘घोषणाबाजी थांबवा’ अशी नेत्यांना विनंती करण्याची वेळ आली. गटबाजी संपली नसून धुसफूस कायम असल्याचे चित्र दिसले.

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण

  • एकूण वेळ- २९ मिनिटे ४९ सेकंद

  • मोदींचे काम - १३.४९. मिनिटे

  • विरोधकांवर टीका - ७ मिनिटे

  • शेतकरी व ऊस कारखाने- ५ मिनिटे

  • इस्लामपूर मतदार संघाबाबत- ५ मिनिटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT