Kolhapur Lok Sabha 2024 Esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : बळ समान, कुणाला मिळणार विजयाचा मान; पाठिराख्यांना सक्रिय करण्याचे नेत्यांसमोर आव्हान

प्रमुख दोन उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांनी नेसरीत झालेल्या सभेत शाहू महाराजांच्या दत्तक विधानावरच प्रश्‍नचिन्ह उभे करून खळबळ उडवून दिली.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघाच्या रिंगणात २३ उमेदवार राहिले असले तरी खरी लढत महायुतीचे विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या प्रमुख दोन उमेदवारांतच असेल. लढत निश्‍चित यापूर्वीच झाली होती. आता पंधरा दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना त्याची पातळी राखण्याचे आव्हान दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांवर असेल.

या मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे, तर दोन मतदारसंघांत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर एका मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे आमदार आहेत. म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती यांचे राजकीय बळ समान आहे. यात विजयाचा मान कोणाला मिळणार याचेच आता औत्‍सुक्य असेल.

प्रमुख दोन उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यातून पाठिराख्यांना सक्रिय करण्याबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचेही आव्हान उमेदवार व त्यांच्यामागे असलेल्या नेत्यांवर असेल. आज लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी गेले महिनाभर दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ गाव, तालुकानिहाय मेळावे, सभा सुरू आहेत. काँग्रेसकडून ज्यादिवशी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी विरोधी उमेदवारांच्या मागे ताकद लावलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी थेट शाहू महाराजांवर टीका करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पण, महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांनी नेसरीत झालेल्या सभेत शाहू महाराजांच्या दत्तक विधानावरच प्रश्‍नचिन्ह उभे करून खळबळ उडवून दिली. त्यातून प्रा. मंडलिक यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र, ते विधानावर ठाम राहिले. प्रा. मंडलिक यांनी केलेल्या आरोपावर थेट शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया न देता त्यांच्या मागे ताकद लावलेल्या आमदार सतेज पाटील यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. निवडणूक शाहू महाराज विरुद्ध प्रा. मंडलिक अशी असली तरी आमदार पाटील विरुद्ध प्रा. मंडलिक वादाचे स्वरूप त्याला येत आहे. त्यातून एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. त्यातून ढासळलेल्या प्रचाराच्या पातळीची एक झलक काल झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत पाहायला मिळाली.

७ मे रोजी मतदान, तर ५ मे रोजी जाहीर प्रचाराची सांगता आहे, तोपर्यंत ही प्रचाराची पातळी कशी राहाणार?, याचीच उत्सुकता आहे. तुलनेने काँग्रेसची मतदारसंघातील बाजू भक्कम असली तरी देशपातळीवर अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला करिष्मा, केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या विविध योजना, त्यातून ग्रामीण भागातील बदललेली मानसिकता याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचाराची सर्वस्व जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. त्यांना आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय घाटगे, श्रीमती संध्यादेवी कुपेकर आदींची साथ आहे.

याशिवाय वंचितसह डाव्या आघाडीतील सर्व पक्ष, संघटना जनता दल, शेकाप या पक्षांची ताकद आहे. पक्षाचे तीन आमदार आणि सतेज पाटील यांची प्रचार यंत्रणा, त्याचे सूक्ष्म नियोजन आणि समाज माध्यमांसह सर्वच बाबतीत सरस असलेली यंत्रणा या जमेच्या बाजू आहेत. त्याला प्रा. मंडलिक यांच्याकडून तोडीस तोड प्रत्युत्तर मिळाल्यास लढत रंगतदार होणार हे निश्‍चित आहे.

महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक हे गेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी झाले. पण, अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या पाच वर्षांचा त्यांची काम करण्याची पद्धत, संपर्क यावर त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठीच मोठा संघर्ष करावा लागला. त्यातच या जागेवर भाजपनेही दावा सांगितल्याने काही काळ त्यांची उमेदवारीही धोक्यात आली होती. पण, अखेर उमेदवारी मिळविण्यात ते यशस्वी झाले.

त्यांच्या मागे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, `शाहू’ ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांच्या ताकदीबरोबरच केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ नेत्यांचा प्रचाराताली सहभाग दिसत आहे. या सर्वांकडून प्रचाराचे रान उठवले जात असले तरी लोकांना गृहित धरून घेतलेला निर्णय आवडत नाही, हा कोल्हापूरचा इतिहास, केंद्र व राज्य सरकारविरोधातील कमी-अधिक प्रमाणातील नाराजी याचे आव्हान प्रा. मंडलिक यांच्यासमोर असेल.

तरुणाईत हिंदुत्‍वाची ‘क्रेझ’

अलीकडच्या चार-पाच वर्षांत जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्य आणि देशभरातील तरुणाईत हिंदुत्वाची मोठी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. हाच मुद्दा भाजप असो किंवा त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या पक्षांनी उचलून धरला आहे. याच मुद्यावर तरुणाईला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूरही याला अपवाद राहिलेले नाही. अगदी काल-परवापर्यंत पुरोगामी विचारधारेसोबत असलेल्या काहींनी ‘हिंदुत्व’ म्हणत वेगळी वाट धरली आहे. त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

विधानसभेचे विरोधक आले एकत्र

निवडणूक लोकसभेची असली तरी अनेकांनी त्यातून आपल्या विधानसभेची पेरणी सुरू केली आहे. परिणामी, विधानसभेतील संभाव्य विरोधक आज जरी एकत्र असले तरी त्यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू आहे. विशेषतः महायुतीत कागलमध्ये मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे, राधागनरीत प्रकाश आबिटकर विरुद्ध के. पी. पाटील, चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील अशा संभाव्य लढती शक्य आहेत. या लढती डोळ्यापुढे ठेवून काम करताना सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीरमध्ये अन्य तुलनेत हा संघर्ष कमी आहे.

‘उत्तर’मध्ये पोटनिवडणुकीचा फायदा

कोल्हापूर उत्तरच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार नव्हता. पण, पोटनिवडणुकीत पहिल्यांदा भाजपने उमेदवार उभा केला होता. या निवडणुकीतील भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना ७५ हजार मते मिळाली होती. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीपेक्षा भाजपला मिळालेली ही सर्वाधिक मते होती. त्यावेळी शहरात फलक लावून भाजपने जोरदार मार्केटिंग केले होते, त्याच जोरावर भाजपने या मतदारसंघात जोरदार फिल्‍डिंग लावली आहे.

परिणामकारक मुद्दे

  • १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा

  • २) केंद्र व राज्य सरकारविरोधातील नाराजी

  • ३) ग्रामीण भागातील बदललेली मानसिकता

  • ४) सतेज पाटील- मंडलिक यांच्यातील आरोप-प्रत्यरोप

  • ५) लोकांना गृहित धरून घेतलेला निर्णयाचा इतिहास

दृष्टिक्षेपात मतदार संघ

  • पुरुष मतदार - ९, ८४, ७३४

  • महिला मतदार - ९,५१, ५७८

  • तृतीय पंथी मतदार - ९१

  • एकूण -१९,३६, ४०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: अरे, ही काय फालतुगिरी! Shubman Gill ला घाई नडली, झाला OUT; गौतम गंभीर चिडला Video

Suresh Dhas: परळीत आणखी एक खून प्रकरण! बालाजी मुंडेंची हत्या कुणी केली? खरा खुनी सोडून ड्रायव्हरला केलं आरोपी; धसांचा गौप्यस्फोट

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील ते दोन ‘वाँन्टेड’ आरोपी आहेत तरी कोण?, ज्यांना 'NIA'ने 'बेपत्ता' ठरवलंय!

Pro Kabaddi 12 Schedule: प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! 'या' चार शहरांमध्ये रंगणार लढती

Latest Maharashtra News Updates : हरणांच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT