Loksabha 2019

Loksabha 2019 : पुण्यात उमेदवारी गुलदस्तात; चुरस अपरिहार्य

सम्राट फडणीस

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील लढतींचे चित्र शनिवारी सायंकाळपर्यंत पुरेसे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली; मात्र भाजप-शिवसेना युतीच्या पातळीवर उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. काँग्रेसचीही हीच अवस्था आहे. परिणामी पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या मतदारसंघांत लढती नेमक्‍या कशा होणार, याबद्दलची अनिश्‍चितता कायम आहे. 

चौथ्यांदा का निवडून द्यावे
युतीच्या ताब्यातील मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ गेले आठवडाभर गाजले, ते ‘राष्ट्रवादी’मुळे. शिरूर मतदारसंघात २००४ पासून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील खासदार आहेत. तिथे ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्त्यांचे बळ आहे आणि ते आढळराव पाटलांसमोर चालत नाही, असे चित्र ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनीच उभे केले. शिवसेनेचे अभिनेते-कम-नेते डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षप्रवेशासह उमेदवारी देऊन ‘राष्ट्रवादी’ने चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. कोरी पाटी असल्यामुळे डॉ. कोल्हेंना बोलायला भरपूर असेल आणि तेच आढळरावांसमोर आव्हान ठरेल. चौथ्यांदा का निवडून द्यावे, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. त्यासोबतच त्यांना कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर निर्माण झालेल्या जातीय ध्रुवीकरणाचाही सामना करावा लागेल. 

...तर बारणेंची डोकेदुखी
मावळमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे आव्हान आहे. घराणेशाहीचा आरोप पार्थ यांच्यावर होणारच. त्याचवेळी बारणेंची मागची निवडणूक फक्त मोदी लाटेचा करिष्मा होता का, हेही ताज्या आव्हानामुळे स्पष्ट होईल. नगरसेवक पदावरून बारणेंनी थेट खासदारकीपर्यंत झेप घेतली होती. घराणेशाही फक्त टीका आणि भाषणांसाठीचा मुद्दा ठरतो की मतदार म्हणून जनताही असा विचार करते, हे या निवडणुकीत दिसेल. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची अजित पवारांशी असलेली दीर्घकाळाची जवळीक आणि पार्थ हे दोन्ही मुद्दे, उमेदवारी मिळाली तरी बारणेंची डोकेदुखी ठरेल. 

कार्य हीच परंपरा 
बारामती मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाचे प्रभावी वक्ते नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली. जात आणि फाटाफुटीची समीकरणे विचारात घेऊनच इथे भाजप उमेदवार देणार हे निश्‍चित. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांचे काम आहे. जातींपेक्षा कामाला महत्त्व देण्याची बारामतीची परंपरा आहे. मताधिक्‍य कमी होऊनही मोदी लाटेत ‘राष्ट्रवादी’कडे टिकलेला हा मतदारसंघ आहे. देशात मोदी लाट वगैरे काही शिल्लक आहे का, याचा अंदाज या मतदारसंघातील वातावरणातून येईल. 

अनाकलनीय विलंब
पुणे मतदारसंघातून उमेदवार निश्‍चित करण्यात भाजपने लावलेला उशीर अनाकलनीय आणि काँग्रेसी वळणाचा आहे. महापालिका आणि सातही विधानसभा मतदारसंघ ताब्यात असलेल्या भाजपमध्ये खासदार अनिल शिरोळे यांना पक्षांतर्गत स्पर्धक आहेत आणि नेत्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत, हे यानिमित्ताने पुढे आले. लोकसभेसाठी आपले नाव गांभीर्याने घ्यावे, यासाठी भाजपचे सहयोगी असलेले राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी मारलेल्या भाजप-काँग्रेस अशा कोलांटउड्यांच्या घोषणांनी पुणेकरांची आठवडाभर करमणूक झाली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि अभ्यासू वक्ते असलेल्या प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या गोटात पसरल्यानंतर निष्ठावंत अस्वस्थ झाले खरे; मात्र लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करेल असा एकही तगडा उमेदवार काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेला नाही, हे कटू वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT