तात्या लांडगे
सोलापूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त उद्या (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार आहेत. दुपारी दोन वाजता पंढरपूर बाजार समितीत श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सवाचे उद्घाटन व कृतज्ञता शेतकरी मेळावा होणार आहे. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सात शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सातही शेतकरी पंढरपूर तालुक्यातील असून ते जिल्हा बॅंकेचे थकबाकीदार आहेत.
राज्य सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख शेतकऱ्यांसह राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या गाव स्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावरील हरकती मागवून अंतिम यादी तयार होईल. त्यानंतर सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. योजनेच्या लाभाची सुरवात उद्या (शुक्रवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तेच होणार आहे.
पंढरपूर बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात खर्डी, सिद्धेवाडी, तावशी, गोळापूर येथील सात शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देऊन त्यांना बोजा कमी झालेला सातबारा दिला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘या’ ७ शेतकऱ्यांची निवड
दादासो भिमराव यादव, ज्ञानोबा भाऊ पिसे (तावशी), सुभद्रा मुरलीधर जाधव, सुभाष गोरख बनसोडे (सिद्धेवाडी), शंकर पांडुरंग माळी, पांडा आबा रोंगे (खर्डी), खुशाबा लक्ष्मण दबडे (गोपाळपूर) या सात शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
बाजार समिती कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष गायकवाड, उपसभापती राजूबापू गावडे यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील १२ आमदार, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.