तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांत ४६७ चोरी, घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे कमी असलेले मनुष्यबळ आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरात दोन दिवसाला तीन चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. दरम्यान, या वर्षात दाखल चोरीच्या एकूण गुन्ह्यांपैकी १५० गुन्ह्यांचा तपास अजूनही लागलेला नाही.
सोलापूरला आता रस्त्यांची, रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील, परराज्यातील चोरटे एसटी बस, रेल्वे किंवा खासगी वाहनाने चोरीसाठी सोलापुरात येतात आणि चोरी करून जातात, अशीही उदाहरणे अनेकदा समोर आली आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या घरात चोरी करणारा चोरटा तर विमानाने बिहारवरून सोलापुरात आला होता. दुसरीकडे सोलापूर शहरात देखील सराईत चोरटे आहेतच.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकांनी घराला लोखंडी सेफ्टी दरवाजा बसवायला हवा, असे पोलिसांचे आवाहन आहे. तसेच शहरातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण सरासरी दररोज एक, असेच आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी कोठेही दुचाकी पार्किंग करू नये. दुचाकीला हॅण्डल लॉकशिवाय टायर तथा चाकाला स्वतंत्र लॉक लावल्यास दुचाकी चोरी थांबतील, असाही विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘या’ वर्षातील चोरी, घरफोडीची स्थिती
दुचाकी चोरी : २८३
दुचाकी शोधल्या : १७७
घरफोड्या : ७२
घरफोडी उघड : ५६
चोरीचे एकूण गुन्हे : ४६७
एकूण गुन्हे उघड : ३१७
तपास न लागलेले चोरीचे गुन्हे : १५०
बंद घरांमध्ये सर्वाधिक चोरी
शहरातील अपार्टमेंटसह अन्य ठिकाणच्या बंद घरांमध्येच सर्वाधिक चोरी, घरफोड्या झाल्याचे पोलिसांत दाखल गुन्ह्यांवरून दिसून येते. परगावी जाताना किंवा कामानिमित्त घराबाहेर जाताना तो व्यक्ती शेजारच्यांना सर्रासपणे सांगत नाही. अनेकांच्या अपार्टमेंट, घरांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. संरक्षक भिंती, सुरक्षारक्षक देखील नाहीत. दुसरीकडे लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू घरात ठेवून परगावी जातात. त्यामुळे सोलापूर शहरात चोरी, घरफोडीचे प्रमाण लक्षणीय आहे.
अवघ्या साडेपाच मिनिटात मिळेल पोलिसांची मदत
आपल्या नगरात, भागात कोणी अनोळखी संशयितरीत्या फिरत असेल किंवा कोणी कायद्याचे उल्लंघन करत असेल तर नागरिकांनी ‘डायल ११२’ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी. अवघ्या साडेपाच मिनिटात त्याठिकाणी पोलिसांची मदत मिळेल. प्रत्येकांनी सतर्क राहावे, जेणेकरून चोरी, घरफोडी असे गुन्हे घडणार नाहीत.
- राजन माने, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.