government scheme ladaki bahin
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना आता रक्षाबंधनापूर्वी प्रत्येकी ३००० रूपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. २८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्यापूर्वी महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचा लाभ एकत्रित मिळेल, असे महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ३० हजार ५६३ महिलांनी अर्ज केले. यामध्ये कुटुंबाचे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि एकाच कुटुंबातील सासू, दोन सूना, मुलींनीही अर्ज केले होते. काही महिने नियमित लाभ मिळू लागला. मात्र, साधारणत: फेब्रुवारी २०२५ पासून योजनेच्या निकषांनुसार सर्वच लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आणि अशा महिलांचा लाभ बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. आता पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा १० ते १५ तारखेपूर्वी लाभ वितरीत होईल, असे नियोजन केले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
३००० महिलांनी नाकारला लाभ, पण...
सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वत:हून नाकारला आहे. या महिला संजय गांधी निराधार योजनेच्याही लाभार्थी आहेत. त्यांच्यासमोर दोन्हीपैकी कोणत्या योजनेचे लाभार्थी राहायचे असा प्रश्न होता. त्यांनी निराधार योजनेलाच पसंती दर्शवत लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्याचे अर्ज दिले. लाडकी बहीण योजनेचे पैसे दरमहा वेळेत मिळत नाहीत, याउलट निराधार योजनेचा लाभ ठरावीक तारखेला दरमहा खात्यात जमा होतो, हे त्यामागील कारण समोर आले आहे.
स्थानिक पातळीवर काहीच माहिती नाही, सगळे मंत्रालयातून
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कामकाज मंत्रालय स्तरावरून पाहिले जाते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नेमक्या किती महिला अपात्र ठरल्या हे समजत नाही. पण, पात्र महिलांना यापुढे दरमहा ठरावीक तारखेला लाभ मिळेल.
- अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती
सुरवातीचे एकूण लाभार्थी
११,३०,५६३
दरमहा लाभाची रक्कम
१६९.५८ कोटी रुपये
सध्या अंदाजे अपात्र
४.३० लाख
दरमहा मिळणारा लाभ
१५०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.