तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २३ ऑगस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी सात तालुक्यांतील ४६ गावांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमधील ६९ हजार ७६५ नागरिक आणि ४५ हजार ९४७ पशुधन बाधित असल्याची नोंद आहे. टँकरच्या मंजूर खेपांपैकी ५३ खेपा झाल्या असून, खेपांची टक्केवारी ९७.१४ आहे. पावसाळ्यातील तीन महिने संपले तरीही जिल्ह्यात सरासरी एवढाही पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अक्कलकोट तालुक्यात चार गावांसाठी एक टँकर सुरू असून, ८७३ लोकसंख्या बाधित आहे. बार्शी तालुक्यात १२ गावांसाठी एक टँकर असून, ५६१ नागरिक आणि ३४३ पशुधन बाधित आहे. करमाळा तालुक्यात आठ गावांसाठी सहा टँकर सुरू आहेत. येथे १४ हजार ६४८ लोकसंख्या आणि ५३ पशुधन बाधित असल्याची नोंद आहे. माढा तालुक्यात आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, २० हजार २४२ लोकसंख्या आणि १७ हजार ८१७ पशुधन बाधित आहे. येथे मंजूर १३.५ खेपांपैकी १२.५ खेपा झाल्या असून, त्याची टक्केवारी ९१.६७ आहे. माळशिरस तालुक्यात चार गावांसाठी चार टँकर सुरू आहेत. या तालुक्यात ७ हजार ६५२ नागरिक आणि २७ हजार ४२९ पशुधन बाधित आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात तीन गावांसाठी पाच टँकर सुरू असून, १२ हजार ३६७ लोकसंख्या बाधित आहे. वडाळा आणि बीबी दारफळ येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात एका गावासाठी एक टँकर सुरू असून, २ हजार ३०८ लोकसंख्या बाधित आहे. सांगोला तालुक्यात सहा गावांसाठी सहा टँकर सुरू असून, ११ हजार ११४ नागरिक आणि ६४ पशुधन बाधित आहे. दरम्यान, मंगळवेढा, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यात टँकर सुरू नसल्याची नोंद अहवालात आहे. जिल्ह्यात एकूण १८ विहिरी आणि १० बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील अकोलेकाट गावास ९ जुलैपासून टँकर सुरू आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावातील टँकर ५ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे.
भीमा, सीनेचा पट्टा सोडून दुष्काळ
सप्टेंबरमध्ये पाऊस न झाल्यास पावसाळ्यात सुरू झालेले टँकर पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत कायम राहण्याची धास्ती वाढू लागली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर उन्हाळ्यात टँकरची संख्या ३०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उजनी धरण १०० टक्के भरले आहे, एवढीच बाब जिल्ह्यासाठी समाधानाची आहे. भीमा नदी, उजनी कालवा व सीना नदी परिसर वगळता जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आतापासूनच होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.