सोलापूर : महायुती सरकारचा गुरुवारी (ता. ५) शपथविधी पार पडणार असून ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ हे समीकरण २०१४ नंतर आता २०२४ मध्ये पण पाहायला मिळणार आहे. २०१४च्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना संधी मिळाली होती. आता त्यांच्याच नेतृत्वातील सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपद मिळणार का आणि त्याची लॉटरी कोणाला लागणार, याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे.
महायुती सरकार स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयातून जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे व पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांना शपथविधीसाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याने पहिल्या टप्प्यात सोलापूरच्या आमदाराचा नंबर लागणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. उद्या (बुधवारी) प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीत संभाव्य मंत्री व त्यांची खातीही निश्चित केली जाणार आहेत. त्यात सोलापूरला लॉटरी लागणार का, याचीही उत्सुकता आहे. सध्या पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सर्वांनाच मंत्रिपदाची आशा आहे, पण पक्षाने दिले किंवा नाही दिले तरी आम्ही समाधानी असू अशा भूमिकेत ते आहेत. तरीपण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला एक मंत्रिपद असणार हे निश्चित मानले जात आहे.
शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले....
आज (ता. ४) भाजप प्रदेश कार्यालयात गटनेता निवडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यासाठी सर्व आमदारांना बोलावण्यात आले आहे. आम्ही स्थानिक पालकमंत्री द्यावा, अशी विनंती प्रदेशकडे केली आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्वच सेलचे प्रमुख पदाधिकारी व अन्य महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईला जाणार आहेत. त्यांना त्याठिकाणी जाण्यासाठी पास लागतील आणि त्यामुळे मी पण बुधवारीच (ता. ४) मुंबईत असणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
बाहेरच्याच पालकमंत्र्यांकडे ५ वर्षे जिल्ह्याचा कारभार
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. सोलापूर जिल्ह्यात प्रणिती शिंदे किंवा अन्य आमदारांच्या माध्यमातून स्थानिक पालकमंत्री देणे शक्य होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्या अडीच वर्षांत दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रिफ, दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री म्हणून संधी दिली. अडीच वर्षानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविले. त्याचा मोठा फटका भाजपला २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सोसावा लागला. आता निश्चितपणे ५ वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न भाजपचा असेल, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.