solapur-pune highway
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचएआय) ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आता महामार्गावरील सावळेश्वर ते वरवडे टोल नाक्यापर्यंत सहा ठिकाणी नव्याने उड्डाणपूल उभारले जात आहेत. मोहोळ येथे यापूर्वीच उड्डाणपूल करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी ७५० जणांचा मृत्यू होतो. सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. सर्व्हिस रोड गावापासून दूर असल्याने वाहनचालक विरुद्ध दिशेने ये-जा करतात. वाहनांचा वेग देखील वाढला आहे. दुचाकी, चारचाकी, जड वाहनांची संख्या जास्त झाल्याने सर्व्हिस रोड अपुरा पडत असल्याचीही स्थिती आहे.
महामार्ग तयार करताना त्यावेळी वाहनांची वर्दळ आता आहे तेवढी नव्हती. अपघाताचे प्रमाणही नियंत्रणात होते. मात्र, आता वाहनांची संख्या वाढल्याने या महामार्गावर सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची आवश्यकता भासली. त्यामुळे एनएचएआयकडून आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारले जात आहेत.
‘या’ ठिकाणी होणार उड्डाणपूल
चिखली (ता. मोहोळ) येथील काम अंतिम टप्प्यात
यावली (ता. मोहोळ) काम पूर्ण होत असून दीड महिन्यात वाहतूक सुरू होईल
अर्जुनसोंड (ता. मोहोळ) येथील एका बाजूचा सर्व्हिस रोड पूर्ण, बाकीचे कामाला ११ महिने लागणार
शेटफळ (ता. मोहोळ) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू, तीन महिन्यात काम पूर्ण होईल
सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे उड्डाणपूल होणार असून एका वर्षात काम पूर्ण होईल
रांझणी (ता. माढा) प्राची हॉटेलजवळ उड्डाणपूल होणार असून त्याचा आराखडा तयार केला आहे
सर्व्हिस रोडवर खड्डेच खड्डे
सध्या काम सुरू असणाऱ्या पुलाच्या कामामुळे यावली, शेटफळ, चिखली या ठिकाणी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली आहे. मात्र पर्यायी केलेल्या या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट झाल्याने पूल सुरू होईपर्यंत वाहन चालकांना खड्ड्यातून कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. अनेक ठिकाणी तर सर्व्हिस रोड देखील नाहीत.
अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट), सतत अपघात होणारी ठिकाणांवर ‘एनएचएआय’कडून सर्व्हिस रोडचा विस्तार, उड्डाणपूल उभारले जात आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांची सोय व्हावी आणि अपघात कमी होतील, हा त्यामागील हेतू आहे.
- स्वप्नील कासार, संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सोलापूर