सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये फुट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ३० जूनला शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी यापुढे राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही, अशी ग्वाही दिली. पण, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
दरवर्षी राज्यात विशेषत: अमरावती, औरंगाबाद व नागपूर या विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती असतानाही त्यावर काहीच ठोस उपाय निघालेले नाहीत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात यंदा बीडमध्ये १५, अमरावती जिल्ह्यात १७५, यवतमाळ जिल्ह्यात १४३, बुलढाणा १५६, जळगाव ११५, औरंगाबाद ९२ आणि वर्धा जिल्ह्यात १०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कधी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर तर कधी दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार मात्र वाढत आहे. हातातोंडाशी आलेले पीक अचानक गेल्याने उत्पादन खर्च देखील वाया गेला आणि बँकेचा हप्ता अंगावर बसला. उत्पन्नावर परतफेड करण्याच्या हिशोबातून घेतलेले खासगी सावकाराचे देणे पण तसेच राहिले. दुसरीकडे घरात वयात आलेली मुलगी आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलाची चिंता, यातून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. जगाचा पोशिंदाच जगण्यासाठी धडपड करतोय, पण त्याच्या अडचणींवर अद्याप शासन स्तरावरून ठोस उपाय निघालेले नाहीत. आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबाला सरकारी मदतीसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, हीदेखील वस्तुस्थिती आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या काळात आत्महत्या केलेल्या जवळपास ४५५ शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
यावर्षीच्या विभागनिहाय आत्महत्या
विभाग आत्महत्या
पुणे १२
नाशिक २५२
औरंगाबाद ६६१
अमरावती ७२५
नागपूर २२५
एकूण १,८७५
शेतकरी आत्महत्या न झालेले जिल्हे
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यासह पुणे, सातारा व गडचिरोली या ८ जिल्ह्यांमध्ये मागील साडेआठ महिन्यांत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. कोकण विभागात मागील तीन वर्षांत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. पुणे विभागात पण आत्महत्या कमी झाल्या आहेत.
जुलै-ऑगस्टमधील विभागनिहाय स्थिती
विभाग आत्महत्या
कोकण ०००
पुणे ४
औरंगाबाद १९७
अमरावती १४७
नागपूर ४३
नाशिक ५२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.