pandharpur palakhi marg
solapur sakal
तात्या लांडगे
सोलापूर : दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी सोहळा होतो. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पायी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंमध्ये असते. त्यांच्यासाठी पूर्वीचा दुपदरी मार्ग अपुरा व असुरक्षित होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखीमार्गांच्या चौपदरीकरण व विकासाचे अधिकृत भूमिपूजन आणि मंजुरी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मार्गांची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. ३६५ किलोमीटर महामार्गांसाठी तब्बल १२ हजार ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे दोन्ही पालख्यांसोबत तसेच या मार्गांवरून वाहनाने येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंनी वाढली आणि त्यांची वारी अधिक सुरक्षित झाली. यातूनच पंढरपुरातील कॉरिडॉरची गरज अधोरेखित झाली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग सहा टप्प्यांत विकसित करण्यात आला. यात मोहोळ ते वाखरी (४४.७० किलोमीटर : १,५४७ कोटी रुपये), वाखरी ते खुडूस (३३.१० किलोमीटर : ९७९ कोटी रुपये), खुडूस ते धर्मपुरी (३९.२० किलोमीटर : १,१५४ कोटी रुपये), धर्मपुरी ते लोणंद (४९.४० किलोमीटर : १,४४१ कोटी रुपये), लोणंद ते दिवेघाट (५४.५० किलोमीटर : १,७१९ कोटी रुपये) आणि दिवेघाट ते हडपसर (१३.२५ किलोमीटर : ८२३ कोटी रुपये) असे टप्पे आहेत. मोहोळ ते वाखरी या पहिल्या टप्प्यात दहा पूल असून पेनूर (ता. मोहोळ) येथे टोलनाका आहे. दुसऱ्या वाखरी ते खुडूस या टप्प्यात १२ पूल असून दोन्ही टप्प्यांचे ९९ टक्के काम झाले आहे. खुडूस ते धर्मपुरी या टप्प्यावर २३ पूल असून ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तिन्ही टप्प्यांवर राजुरी व अन्य एका ठिकाणी टोलनाका आहे.
शेवटच्या दिवेघाट ते हडपसर या टप्प्याचे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे पाटस ते बारामती (४१.२६ किलोमीटर : १,३४२ कोटी रुपये), बारामती ते इंदापूर (४२.१३ किलोमीटर : १,४७१ कोटी रुपये) आणि इंदापूर ते बोंडले (४६.७० किलोमीटर : १,६०३ कोटी रुपये) असे तीन टप्पे आहेत. तिन्ही टप्प्यांची कामे ८४ ते ९९ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत. भविष्यात आषाढी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी वाढतच राहील, अशा दृष्टीने हे पालखीमार्ग विकसित करण्यात आले आहेत.
दोन्ही पालखीमार्गांबद्दल थोडक्यात...
१) संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग
आळंदी ते पंढरपूर या २३४.२५ किलोमीटर मार्गासाठी सात हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पालखी सोहळ्यासमवेत दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी पंढरीत येतात. हा महामार्ग पुण्यातील हडपसरपासून मोहोळपर्यंत विकसित करण्यात आला आहे. हडपसर, सासवड, जेजुरी, नीरा, फलटण, नातेपुते, माळशिरस, बोंडले, वाखरी आणि पंढरपूर या गावांच्या हद्दीतून हा मार्ग जातो. पूर्वीचा दुपदरी रस्ता आता चौपदरी झाला असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र साडेतीन मीटर रुंदीचा पालखीमार्ग तयार करण्यात आला आहे. पालखीमार्गाच्या दोन्ही बाजूंना देशी वृक्ष (कडुलिंब, वड, पिंपळ, चिंच, करंज, शिसम आदी) लावण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर येथे बाह्यवळण रस्ते करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर झाला आहे. माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक विहीर, वेळापूर येथील पुरातन लेणी आणि वाखरीजवळील बाजीराव विहीर जतन करण्यात आली आहे. पालखीमार्गाचे काम करताना सोलापूर व सातारा जिल्ह्यातील ४३ तलावांचे खोलीकरण करून तेथील मुरूम कामासाठी वापरण्यात आला. त्यामुळे तलावांची पाणी साठवण क्षमताही वाढली आहे.
----------------------------------------------------------------------
२) संत तुकाराम महाराज पालखीमार्ग
देहू ते पंढरपूर या १३० किलोमीटर मार्गासाठी चार हजार ४१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत सहा ते सात लाख वारकरी पंढरपूरला येतात. पुणे व सोलापूर जिल्ह्यांतून हा पालखीमार्ग जातो. पुण्यातील पाटसपासून तोंडले गावापर्यंत हा मार्ग असून पाटस, बारामती, लासुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, बावडा, अकलूज, श्रीपूर, बोरगाव आणि तोंडले या गावांना हा मार्ग जोडतो. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चौपदरी महामार्गाच्या बाजूला स्वतंत्रपणे साडेतीन मीटर रुंदीचा पालखीमार्ग तयार करण्यात आला आहे. या पालखीमार्गावर लिंब, वड, पिंपळ, चिंच, शिसम, जांभूळ, उंबर आणि बांबू यांची लागवड करण्यात आली आहे. या मार्गावर बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज, श्रीपूर आणि बोरगाव येथे बाह्यवळण रस्ते प्रस्तावित आहेत. मार्गावरील २५ तलावांचे खोलीकरण करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. पर्यावरण संतुलनासाठी हिंगणीगडा आणि कन्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
पालखी मार्गामुळे वारी सुलभ
संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्या मार्गावरून यायच्या, तो मार्ग पूर्वी दुपदरी होता. आता तो चौपदरी करण्यात आला असून, बाजूला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र साडेतीन मीटर रुंदीचा पालखीमार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता विनाअडथळा पालख्या येऊ लागल्या असून, अपघातही बंद झाले आहेत. पालखी मार्गांलगत वृक्षलागवड केल्याने भविष्यात वारकऱ्यांना सावली मिळेल.
- अभिजित औटे, प्रकल्प संचालक, एनएचएआय, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.