RTO Office meeting
solapur sakal
तात्या लांडगे
सोलापूर : ‘महाराष्ट्रात जन्मलो, मराठीत शिक्षण घेतले, चांगले मराठी बोलता येते. मग प्रमाणपत्र कशासाठी? सरकारचे हे धोरण केवळ मुस्लिमांसाठी आहे का?’ असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला. त्यावर ‘आपण आमचे बंधू आहात. मराठीवरील प्रेमापोटी सरकारने हे धोरण आणले असून त्यासाठी कायदाही करण्यात आला आहे. यात कोणताही भेदभाव नाही,’ असे सांगत मान्यवरांनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद न साधणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर १६ ऑगस्टपासून कारवाई करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ७) प्रादेशिक परिवहन कार्यालयात मराठी भाषा शिकवणी वर्गांतर्गत ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी ज्याची मातृभाषा किंवा बोलीभाषा मराठी नाही, तो अमराठी समजला जातो, अशी अमराठीची व्याख्या डॉ. ज्योती ठाकरे यांनी स्पष्ट केली. ‘महाराष्ट्राने आपल्याला ममत्व दिले आहे.
आपली रोजीरोटीही याच भूमीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रवासी कोणतीही भाषा बोलत असला, तरी त्याच्याशी मराठीतूनच संवाद साधणे अपेक्षित आहे. यासाठीच अमराठी वाहनचालकांसाठी मराठी भाषा अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे,’ असे त्यांनी सांगितले. यावर रिक्षाचालक रियाज सय्यद यांनी ‘आम्हाला मराठी येते, मग प्रमाणपत्राची गरज काय?’ असा प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकारचा हा कायदा असून त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगताना, नावावरून अमराठी रिक्षाचालकांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत फक्त मेट्रो शहरांतील संघटनांशी चर्चा झाली असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीची आवश्यकता तेथेच आहे. उर्वरित महाराष्ट्रात त्याची गरज नसल्याचे मत रियाज सय्यद यांनी व्यक्त केले. रिक्षाचालकांची ही भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही डॉ. ठाकरे यांनी दिली. तसेच प्रदीप ढवण यांनी, ‘मराठी भाषेच्या संवर्धनाच्या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आला असून, सरकारचा कोणताही भेदभाव करण्याचा हेतू नाही,’ असे स्पष्ट केले. प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी निर्णयामागील उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी हर्षला लिखिते, ॲड. सुरेश प्रधान, जवाहर पुरोहित, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुलाणी, स्वप्निल गिरी आदी उपस्थित होते. तसेच महिपती पवार, गफार खान, गजानन डोलार, तानाजी मसलकर, इर्शाद शेख, महादेव राठोड आदी रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूरसाठी सवलत
मराठी भाषा अभ्यासक्रमासाठी चार तासांचे चार वर्ग अपेक्षित आहेत. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मात्र, सोलापुरातील अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलता येत असल्याने त्यांच्यासाठी केवळ एकाच वर्गाची सवलत देण्यात येणार असल्याचे डॉ. ज्योती ठाकरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.