तात्या लांडगे
सोलापूर : आता इयत्ता बारावीसह पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डिप्लोमाच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’तून ११ महिन्यांचे नोकरीपूर्व प्रशिक्षण घेता येणार आहे. या काळात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार, आयटीआय, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचे विद्यावेतनही मिळणार आहे. त्याची नोंदणी सध्या सुरू आहे.
खासगी उद्योग किंवा आस्थापनांमध्ये नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी तरुण-तरुणींना पहिल्यांदा ‘कामाचा अनुभव किती?’ असाच प्रश्न विचारला जातो. त्यावेळी अनेकदा अनुभव नसल्याने त्यांना नोकरी मिळत नाही किंवा अपेक्षित पगार मिळत नाही. या पार्श्वभूमीवर अशा तरुणांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. सुरुवातीला शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापना, उद्योग, बॅंकांमध्ये या तरुणांना नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी मिळत होती. पण सुरुवातीलाच काही तरुण-तरुणींनी ज्या ठिकाणी त्यांनी नोकरीपूर्व प्रशिक्षण घेतले, त्या शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये कायम करण्याची मागणी करत आंदोलने केली.
शासनाने आता सरकारी कार्यालयांमधील नोकरीपूर्व प्रशिक्षण बंद केले आहे. आता या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार खासगी उद्योगांमध्येच ११ महिन्यांचे नोकरीपूर्व प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना प्रशिक्षणाची संधी मिळेल आणि त्या काळात त्यांना दरमहा विद्यावेतनही मिळणार आहे.
नोकरीपूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरु
सोलापूर जिल्ह्यातील १५० विद्यार्थ्यांना यंदा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. ज्या उद्योगांमधील कामगारांची संख्या २० पेक्षा जास्त आहे आणि जे ‘ई-पीएफ’ भरतात, अशा उद्योगांना आम्ही भेटी देत आहोत. योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना त्या उद्योगांच्या ठिकाणी नोकरीपूर्व प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहे.
- संगीता खंदारे, सहआयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
आज करा ‘या’ संकेतस्थळावर अर्ज
इयत्ता बारावी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा) किंवा पदवीधर, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीपूर्व प्रशिक्षणासाठी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक आणि ई-मेल आयडी लागतो. स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक टाकून अर्ज सबमिट केल्यानंतर ओटीपी येतो. त्यानंतर लक्षात राहील असा पासवर्ड टाकून नोंदणी करावी. नोंदणीनंतर काही दिवसांनी मेसेज येतो किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जाऊनही चौकशी करता येते. कार्यालयाकडून शैक्षणिक पात्रतेनुसार खासगी उद्योगांमध्ये नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.