सोलापूर : आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना आता एकत्रितपणे राबविली जात असून त्यामधून प्रत्येक कुटुंबातील रुग्णास १३५६ आजारांवर मोफत उपचाराची संधी आहे. नवजात शिशुपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेवू शकतात. रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील प्रत्येक घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आयुष्यमान भारत योजनेचा निर्णय झाला. राज्य सरकारने गतवर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना एकत्रित राबविण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारापासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आता ही योजना लागू आहे. पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील व्यक्ती देखील ‘आयुष्यमान कार्ड’ काढून योजनेचा लाभ घेवू शकतो.
सध्या जिल्ह्यातील ५२ रुग्णालयात या योजनेतून मोफत पाच लाखांपर्यंत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबातील रुग्णाने गावातील ऑनलाइन सेवा केंद्रातून आयुष्यमान कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील खाटांची क्षमता ७६० पर्यंत असतानाही रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्याठिकाणी ३६५ दिवसांतील किमान ३०० दिवस तरी एक हजारांहून अधिक रुग्ण मोफत उपचार घेतात. आता सर्वोपचार रुग्णालयाच्या जोडीला १०० खाटा महिला व बालरुग्णालय तर १०० खाटांचे सर्वोपचार जिल्हा रुग्णालय देखील आहे. त्यातून त्यांचे कोट्यवधी रुपयांची बचत होत असल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यातील शासकीय ‘आरोग्य’
प्राथमिक आरोग्य केंद्रे
८२
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे
४३१
ग्रामीण रुग्णालये
१२
उपजिल्हा रुग्णालये
३
सर्वोपचार रुग्णालय
१
जिल्हा रुग्णालय
१
दरवर्षी २० लाखांहून अधिक रुग्णांची मोफत सेवा
जिल्ह्यातील ८२ गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ४३१ गावांमध्ये उपकेंद्रे आहेत. याशिवाय १२ आपले दवाखाने देखील सुरू आहेत. त्याठिकाणी आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांना प्रत्येक आजारांवरील औषधे मोफत दिली जातात. याशिवाय पुढील उपचाराची गरज असल्यास त्यांना संदभसेवा देखील दिली जाते. दरवर्षी अंदाजे २० लाखांहून अधिक लोक या सरकारी केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराचा लाभ घेतात.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.