Solapur Crime
सोलापूर : ‘मकोका’अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई टाळण्यासाठी सहायक फौजदाराच्या माध्यमातून संशयितांकडे ६५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे हा कोल्हापूर पोलिस मुख्यालयात कार्यरत असून त्याच्यासोबत माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूकजवळील वडाचीवाडी येथील सतीश रामदास सावंत, समीर अब्बास पानारी (वय ३५, रा. महावीर नगर, हुपरी, ता. हातकणंगले), मुंबईतील कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला ऊर्फ लालासाहेब ज्ञानेश अडगळे (रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचाही त्यात समावेश आहे. पोलिसांनी समीर पानारी व लाला अडगळे यांना अटक केली आहे.
अकलूज येथील प्रदीप चंद्रकांत माने (वय २५) हा तरुण मजुरी करतो. १४ जून २०२५ रोजी त्याच्यावर लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे याच्यासह १३ जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि सध्या ते कारागृहात आहेत. पोलिसांनी कारागृहातील त्या सर्वांवर ‘मकोका’अंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई प्रस्तावित केली. त्याचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाच जणांनी खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, अकलूज पोलिसांनी समीर पानारीला २८ सप्टेंबरला तर लाला अडगळेला २३ सप्टेंबरला अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांनी सतीश सावंत, कमलेश कानडे, सहायक फौजदार मिलींद नलावडे यांची नावे घेतली.
नलावडे सध्या कोल्हापूर पोलिस मुख्यालयात कार्यरत असून रजेवर आहे. खंडणीच्या गुन्ह्याचा तपास खोलवर केल्यास अशा पद्धतीने खंडणी उकळणारी कोल्हापूर, हुपरी, मुंबई आणि सोलापूरमधील संशयितांची टोळी उघड होऊ शकते, असे बोलले जात आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी कोठूनतरी या कारवाईसंदर्भातील माहिती घेऊन हे कृत्य केले असून संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी दिली. संशयितांकडे कसून तपास सुरू असून त्यानंतर त्यांनी या कारवाईसंदर्भातील माहिती कोठून घेतली हे समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.
व्हॉट्सॲप कॉल रेकार्ड केला अन्...
‘मकोका’ची प्रस्तावित कारवाई रद्द करण्यासाठी पानारी (हुपरी) याने कारागृहातील आरोपींचा नातेवाईक समजून फिर्यादीलाच कॉल केला. ही कारवाई रद्द होऊ शकते असे सांगून प्रदीपला व्हॉट्सॲप कॉल करण्यास सांगितले. प्रदीपने तो कॉल दुसऱ्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड केला. वारंवार कॉल करून ६५ लाख रुपयांची खंडणी मागितली. ‘पैसे नाही दिले तर अवघड होईल, तुम्हाला जमत नसेल तर मी भेटायला येतो’, असेही तो म्हणाला. पानारीने केलेला व्हिडिओ कॉल प्रदीपने रेकॉर्ड केला आणि पानारीचे डिपीवरील छायाचित्र कोल्हापुरातील मित्रांना पाठवले. त्या समीर पानारीची खात्री करून प्रदीपने खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरूद्ध अकलूज पोलिसांत फिर्याद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.