HSRP numberplate
sangli
तात्या लांडगे
सोलापूर : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ६२ हजार वाहनधारकांनी अद्याप प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आरटीओकडून एक जुलैपासून स्वतंत्र दंडात्मक कारवाई सुरू असतानाच, आता शहर वाहतूक शाखेनेही एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाईचा फास आवळला आहे. शहरातील विविध मार्गांवर बसवलेल्या ३३१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत एचएसआरपीविना वाहन आढळल्यास संबंधित वाहनधारकाला थेट एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ रोजी संपली. त्यामुळे १ जुलैपासून मोटार वाहन कायद्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाकडून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांनीही आढावा बैठक घेऊन कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, शहर वाहतूक शाखेकडून शहरात वाहतूक नियमभंगाविरोधात नियमित कारवाई केली जात आहे. या मोहिमेत आता एचएसआरपी नसलेल्या वाहनांवरही स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, वाहतूक अंमलदारांसोबतच शहरातील ३३१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
‘एचएसआरपी’ नोंदणी प्रक्रिया सुरू
सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत जिल्हाभर एचएसआरपी बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी, मध्यम व अवजड वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जात आहे. यामध्ये फिटमेंट शुल्काचा समावेश असून जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जाणार आहे.
सोलापुरातील ‘एचएसआरपी’ची स्थिती
एकूण वाहने
९,३२,०००
‘एचएसआरपी’ बसवलेली वाहने
२,६९,९०७
‘एचएसआरपी’ न बसवलेली वाहने
६,६२,०९३
२० दिवसांत ५८९ वाहनांवर कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागाने १ जुलै ते २० जुलै या कालावधीत एचएसआरपी नसलेल्या ५८९ वाहनधारकांवर कारवाई करून ५ लाख ८९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक वाहनावर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
‘एचएसआरपी’ नसल्यास अडकणार ‘ही’ कामे...
वाहन हस्तांतरण
पत्ता बदल
कर्जाची नोंद किंवा वजावट
वाहनाची पुनर्नोंदणी
वाहनातील बदलांची नोंद
परवान्याचे नूतनीकरण
वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू नाही.
दोन दिवसांत ४५४ वाहनांना ई-चलन
शहर वाहतूक शाखेने गेल्या दोन दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक अंमलदारांच्या मदतीने ४५४ वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. चार हुतात्मा रोड, बाळीवेस, गोंधळे वस्ती, खारी बावडी रोड आणि सग्गम नगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. यात मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे २८४, ट्रिपल सीट प्रवास करणारे १२६ व समोरील आसनावर प्रवासी बसवणारे ४४ रिक्षाचालक वाहनधारकांचा समावेश आहे.
वाहनधारकांनी वाहनास ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी
'एचएसआरपी'साठी चार-पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. वरिष्ठांच्या सूचनेनुसार एक जुलैपासून कारवाई सुरू केली आहे. ज्यांनी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे, त्यांना कारवाईतून सूट मिळू शकते. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने नोंदणी करून एचएसआरपी बसवून घ्यावी.
- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
---------------------------------------------------------------------------
...आता थेट कारवाईला सुरवात
वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर नियमित कारवाई केली जात आहे. आता एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवरही वरिष्ठांच्या सूचनेनुसार थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. सुरुवातीला वाहनधारकांना समज देण्यात आली; मात्र आता कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी वाहतूक अंमलदारांसह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचीही प्रभावी मदत घेतली जात आहे.
- सुधीर खिराडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.