तात्या लांडगे
सोलापूर : शेतीच्या बांधावरून, हद्दी-खुणांवरून होणारी दोघांमधील भांडणे आता लगेचच मिटणार आहेत. महसूल व वन विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता खासगी भूमापकदेखील शेतजमिनींची मोजणी करून शकणार आहेत. त्यासाठी त्या भूमापकांना भूमिअभिलेख अधीक्षकांकडून परवाना घ्यावा लागणार आहे. भूमापक स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग) पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सरासरी ८०० शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करतात. त्यातील १५० हून अधिक शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी पैसे भरून पोलिस बंदोबस्त घ्यावा लागतो. परंतु, भूमिअभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करूनही त्यांना दोन-तीन महिने वाट पहावी लागते. त्यामुळे दोन शेतकऱ्यांमधील वाद विकोपाला पोचतो आणि पोलिसांत गुन्हे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार आहे.
कुटुंबाच्या नावे असलेल्या सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक पोटहिश्शाच्य मोजणीसाठी केवळ २०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. आता खासगी भूमापकांनी मोजणी कशी करायची, मोजणीनंतर हद्दखुणा निश्चित कशा करायच्या, त्यावेळी तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयातून तपासणी करून घ्यावी, अशी कार्यपद्धती निश्चित केली जात आहे. कार्यपद्धती अंतिम होऊन त्याला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर या नव्या पद्धतीनुसार अंमलबजावणी सुरु होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय
खासगी परवानाधारक भूमापक आता जमिनींची मोजणी करू शकणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही निश्चित केली जात आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर नुकतेच परिपत्रकदेखील काढण्यात आले आहे. लवकरच शासनाच्या या निर्णयानुसार कार्यवाही सुरु होईल, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
- दादासाहेब घोडके, अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर
शासनाचे परिपत्रक नेमके काय?
महाराष्ट्र जमीन महसूल (हद्द व हद्दीखुणा) १९६९ मधील नियम १३(२) च्या तरतुदीनुसार एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिश्शांची मोजणी फी निश्चित करण्यात आली आहे. एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीच्या नोंदणीकृत वाटणी पत्राद्वारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ नुसार विभाजन तथा प्रति पोटहिश्श्यासाठी मोजणी शुल्क २०० रुपये असणार आहे. महसूल व वन विभागाचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून त्यानुसार सर्व भूमिअभिलेख कार्यालयांनी ई- मोजणी व्हर्जिन ०.२ अंतर्गत कार्यवाही करावी, असे त्या पत्रात नमूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.