सोलापूर : दावोस दौऱ्यात साडेतीन लाख कोटींचे करार झाल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेपंधरा लाखांहून अधिक कोटींची गुंतवणूक दावोस दौऱ्यातून राज्यात येणार असल्याचे सांगितले. पण, नवीन उद्योजकांना उद्योगासाठी जागेची मागणी करूनही ती मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. जागेअभावी सद्य:स्थितीत अंदाजे १५० हून अधिक उद्योजकांची सुमारे दहा हजार कोटींची गुंतवणूक थांबली आहे.
नवउद्योजकाला उद्योग सुरु करण्यासाठी पाच वर्षांसाठी जागा दिल्यानंतर मुदतीत उद्योग सुरु न केल्यास त्यांना नकाशा मंजुरी, बांधकाम अशा बाबींवर वार्षिक चारवेळा मुदतवाढ मिळते. त्यानंतर कारणे दाखवासह अन्य दोन नोटिसा बजावल्या जातात. तरीदेखील उद्योग सुरु केल्यास कागदपत्रे पाहून पाच टक्के शुल्क व उपअभियंत्यांची येणेबाकी कपात करून उर्वरित रक्कम (चालू प्रचलित भूखंड वाटप दरानुसार) संबंधितास परत करून जागा परत घेतली जाते.
याशिवाय पंचनामा करूनही जागा परत घेतली जाते. त्यावेळी उद्योजकाने भरलेल्या रकमेतील १० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र, २३ जानेवारी २०२३च्या नवीन धोरणानुसार कागदावरील उद्योजकांसाठी विशेष मुदतवाढ योजना जाहीर झाली आणि त्याला दोनदा मुदतवाढ दिली. त्यामुळे कागदावरील उद्योजकांकडे राज्यातील ३०६ एमआयडीसींमध्ये सुमारे एक ते दीड हजाराहून अधिक प्लॉट अडकले आहेत.
मुदतीनंतर उद्योग सुरु न करणांऱ्याकडून जागा परत घेतली जाते
५० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचे अर्ज प्रायॉरिटी धोरणानुसार ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यालयास पाठविले जातात. दुसरीकडे मुदतीत उद्योग सुरु न करणाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना दिलेली जागा परत घेण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाते. त्यातील काहीजण विशेष मुदतवाढ योजनेत सहभागी होतात. चिंचोली ‘एमआयडीसी’त अतिरिक्त १५१ हेक्टर भूसंपादनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी (एमआयडीसी), सोलापूर
सोलापूरच्या बड्या उद्योजकाचा अनुभव
सोलापुरातील एका मोठ्या उद्योजकाला नव्या प्लांटसाठी चिंचोली एमआयडीसीत ७० ते ८० एकर जमीन पाहिजे होती. ४५० ते ५०० कोटींची गुंतवणूक करुन उद्योग सुरु करण्यासाठी त्यांनी वारंवार मुदतवाढ देऊनही कागदावरच असलेल्या उद्योजकाची जागा मागितली. ती जागा घेऊन नवा उद्योग तातडीने सुरु करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. खूप प्रयत्नानंतर त्यांना शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे काही दिवसांपूर्वी जागा मिळाली, असा अनुभव त्यांनी सांगितला.
७०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी १० उद्योजक दोन महिन्यांपासून जागेच्या प्रतीक्षेत
सोलापूर जिल्ह्यासह बाहेरील १० उद्योजक सुमारे ७०० कोटींची गुंतवणूक करुन सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीत उद्योग सुरु करण्यास इच्छुक असून तसे त्यांनी अर्ज केले आहेत. पण, दोन-अडीच महिने होऊनही त्यांना अजून जागा मिळालेली नाही. आता त्यातील काही उद्योजक बाहेरील राज्यात, जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.