सोलापूर : खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायाची पदभरती बंद केल्याने राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल २५ हजार जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत. दुसरीकडे २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक, अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहा हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यासंबंधीचा शासन निर्णय निघाला असून सरळसेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आकृतिबंध निश्चित नसल्याने सहा ते सात वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती. आता तो आकृतिबंध निश्चित करून २०२३-२४ च्य संचमान्यतेवरुन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे. एकूण मंजूर पदांपैकी ८० टक्के पदभरती करता येणार आहे. पण, सध्याचा संस्थांमधील कार्यरत शिपाई सेवानिवृत्त झाल्यावर त्याठिकाणी अनुदानित तत्त्वावर शिपाई भरता येणार नाही. दुसरीकडे जो शिपाई पदोन्नतीसाठी पात्र आहे, त्याची पदोन्नती झाल्यावर रिक्त पदावर नवीन शिपाई भरता येणार नाही, असे निर्बंध शिक्षण विभागाने घातले आहेत.
वेतनेतर अनुदानातून संस्थांना नेमता येतील शिपाई, पण हमीपत्राचे बंधन
शाळांमधील अनुदानित तत्त्वावरील शिपाई हे पद कायमचे रद्द करण्यात आले आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानातून शिपाई भरता येईल. पण शिपाई पदभरतीवेळी त्याच्याकडून पुढे कायमची मागणी करणार नाही, असे हमीपत्र घेणे बंधनकारक आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती
लिपिक संवर्ग
४,४७०
प्रयोगशाळा सहाय्यक
१,५३०
एकूण पदभरती
६,०००
शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अधिकार संस्थांना
शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार २०२३-२४ च्या संचमान्यतेच्या अनुषंगाने खासगी अनुदानित शिक्षण संस्थांना लिपिक संवर्गातील रिक्त पदे (८० टक्के) व प्रयोगशाळा सहाय्यकांची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही पदे सरळसेवा पध्दतीने भरली जाणार आहेत. शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा संपूर्ण अधिकारी सध्यातरी संस्थांनाच देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.