Teacher Recruitment
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : खासगी शिक्षण संस्थांमध्ये आता मनमानी पद्धतीने शिक्षक भरता येणार नाहीत. १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवाराचीच निवड करावी लागणार आहे. तत्पूर्वी, गुणवत्ता यादीनुसार पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी तीन उमेदवार शाळेत मुलाखतीसाठी पाठविले जातील. संस्थेने त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. १०० पैकी अवघे १० गुण संस्थेच्या हाती असणार आहेत. त्यातील पाच गुण उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व व संभाषण कौशल्यास तर पाच गुण अध्यापन कौशल्यासाठी आहेत. तिन्ही उमेदवारांच्या मुलाखतीचे रेकॉर्ड त्या संस्थेला जतन करुन ठेवावे लागणार आहेत. कोणी तक्रार केल्यास शिक्षणाधिकारी रेकॉर्ड पाहून निर्णय घेतील, अशी नवी नियमावली आहे.
सोलापूरसह राज्यातील खासगी शिक्षण संस्था व जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे १५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यातील अंदाजे सात हजार शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत. सध्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर रिक्त राहिलेल्या पदांच्या जाहिराती ३१ मेपर्यंत पवित्र पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर ज्या ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवारांनी यापूर्वीच पवित्र पोर्टलवर नोंदणी केली, त्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ५० संस्थांचा प्राधान्यक्रम भरता येणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी १०० शाळांचा प्राधान्यक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होतील. नेहमीप्रमाणे एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरती होणार आहे. या भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये ३०० शिक्षकांची भरती होईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
३१ जुलैपूर्वी पूर्ण होईल शिक्षक भरतीची प्रक्रिया
खासगी अनुदानित शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु आहे. ३१ मेपर्यंत त्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील १५-२० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थामधील रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर जुलैअखेर खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल.
- शशिकांत चिमणे, सहायक आयुकत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिक्षक भरतीसंदर्भातील ठळक बाबी...
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीची अट नाही. ‘टीईटी’चे गुण, व्यावसायिक व शैक्षणिक अर्हतेच्या गुणांवरुन त्यांच्या निवडी होतील.
खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी १०० गुणांमधून सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांचीच निवड होईल. त्यात संस्थेकडून मुलाखतीस १० गुण दिले जातील.
पवित्र पोर्टलवरील उमेदवारांच्या कागदपत्रांवरुन (शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता) व ‘टीईटी’त मिळालेल्या एकूण गुणांंवरुन ९० गुण दिले जाणार आहेत.
उमेदवारास ‘टीईटी’तून ७५ गुण, व्यावसायिक अर्हतेसाठी ८ व शैक्षणिक अर्हतेनुसार ७ गुण मिळतील. त्यातून सर्वाधिक गुण मिळालेला उमेदवार त्या संस्थेत शिक्षक म्हणून निवडला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.