तात्या लांडगे
सोलापूर : खासगी अनुदानित माध्यमिक शाळांसह प्राथमिक शाळांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, माध्यमिक विभागाकडील अडीच हजार आणि खासगी प्राथमिकच्या सुमारे पाचशे शाळांनी अनुदानाचा प्रकार, शाळांचे माध्यम, मंजूर व कार्यरत पदे, पटसंख्या याची माहिती अद्याप दिलेली नाही. या शाळांना माहिती देण्यासाठी शिक्षण संचालकांनी मुदत दिली आहे. मुदतीत माहिती न देणाऱ्या शाळांमधील सर्वांचेच पगार मार्चपासून थांबविले जाणार आहेत.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पटसंख्येनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांची सध्या संचमान्यता केली जात आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेनंतर पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची भरती होईल. त्याचवेळी राज्यातील जिल्हा परिषदांच्या ६५ हजार शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. १५ जूनपूर्वी या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक विभागाच्या संचालकांनी सर्व खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या आणि रिक्त- अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. पण, अद्याप तीन हजार शाळांनी माहिती दिलेली नाही. या आठवड्यात माहिती न दिल्यास त्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबविला जाणार असून तसा इशारा शिक्षण संचालकांनी दिला आहे.
सर्व शाळांनी द्यावी मुदतीत माहिती, अन्यथा...
सध्या संचमान्यतेची कार्यवाही सुरू असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील १७ हजारांपैकी सुमारे अडीच हजार शाळांची माहिती अप्राप्त आहे. त्यांना माहिती देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत माहिती न दिल्यास मार्चपासून त्या शाळांचा पगार थांबू शकतो.
- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पुणे
‘नववी-दहावी’साठी २० पटाचीच अट
नववी-दहावीच्या वर्गासाठी किमान २० पट असावा, अशी अट आहे. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटाचे वर्ग तथा शाळा आता बंद कराव्या लागणार आहेत. तत्पूर्वी, या वर्गांसाठी घातलेली पटाची अट शिथिल करावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय ग्राह्य मानल्याने आता २० पटाच्याच वर्गांतील तथा शाळांमधील शिक्षक कार्यरत राहतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.