सोलापूर : निवडणुकीपूर्वी बीएलओंच्या माध्यमातून मतदार यादीचे काम पूर्ण केले जाते. राष्ट्रीय कार्य असल्याने बीएलओ म्हणून नेमलेल्यांना ते काम करावेच लागते. याशिवाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनाही ते कर्तव्य पार पाडावेच लागते. निवडणुकीपूर्वीच अनेकांनी ड्यूटी रद्दसाठी फिल्डिंग लावली आहे, पण अत्यावश्यक कारण असल्याशिवाय कोणाचीही ड्यूटी रद्द होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासकीय, निमशासकीय व शासनमान्य स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना बीएलओ म्हणून नेमले जाते. याशिवाय लोकसभा, विधानसभेसह इतर निवडणुकीसाठीही त्यांची नेमणूक केली जाते. जिल्ह्याचे प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार असतात. अनेकजण बीएलओंची ड्यूटी रद्दसाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे शिक्षकांना बीएलओंच्या ड्यूटीतून मुक्त करण्याचीही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे.
बीएलओंची ड्यूटी ही अशैक्षणिक काम असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अशैक्षणिक कामांमध्ये बीएलओ ड्यूटीचा उल्लेखही नाही. त्यामुळे शिक्षकांना बीएलओंची ड्यूटी करावीच लागणार आहे. दरम्यान, निवडणूक कामासाठी बहुतेक शाळांमधील शिक्षकांची नेमणूक केली जाते. निवडणूक ड्यूटीसाठी आम्ही तयार आहोत, पण बीएलओंची ड्यूटी नको, अशी शिक्षकांची ठाम भूमिका आहे. दुसरीकडे शिक्षकांच्या मागणीवर जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे.
विधानसभेसाठी म्हैसूरची इंडेलिबल शाई
विधानसभा निवडणुकीसाठी म्हैसूर येथून इंडेलिबल इंक (शाई) मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन हजार ७२३ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी शाईच्या प्रत्येकी दोन बाटल्या दिल्या जातात. याशिवाय १० टक्के जादा बाटल्या मागविल्या आहेत. एकूण साडेनऊ हजार बाटल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यासाठी येतील. बोटाच्या नखाला लावलेली ती शाई किमान दीड ते दोन महिने जात नाही, असे तिचे वैशिष्ट्य आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही
विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास २२ हजार कर्मचारी नेमले जातील. त्यांची यादी तयार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांना इलेक्शन ड्यूटीची पत्रे पाठविली जातील. दोन प्रशिक्षण (प्रत्येकी एक दिवस) आणि निवडणुकीसाठी दोन दिवसांची त्यांना ड्यूटी राहील. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी बीएलओ असो किंवा इलेक्शन ड्यूटीसाठी कर्मचारी नेमतात.
- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.