शिरूर : 'राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे', या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावरून राळ उठली असताना, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज येथे झालेल्या महिला मेळाव्यात दरेकरांची पाठराखण केली. दरेकरांचे ते वक्तव्य महिलांचा अपमान करणारे नव्हे़ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खरे रूप उघडे करणारे होते, असे त्या म्हणाल्या.
पुणे, मुंबईत झालेल्या महिला अत्याचारांबाबत इव्हिडन्सशिवाय गुन्हा नोंदविण्यास दिरंगाई करणा-या पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणता इव्हिडन्स शोधला, असा सवाल वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या, दरेकर यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग मी एकले आहे. त्यात त्यांनी कुठेही महिलांचा उल्लेख केलेला नाही. राष्ट्रवादीच्या लोकांचे बड्या लोकांशी, भांडवलदार, कारखानदारांशी असलेले साटेलोटे त्यांनी बोलीभाषेत मांडले. त्यावरून एवढा गहजब माजवणे योग्य नाही.
प्रवीण दरेकर यांच्याविरूद्द गुन्हा दाखल करण्यासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती गुन्हेगारांना, बलात्का-यांना जरब बसेल यासाठी दाखवा, असे आवाहन वाघ यांनी केले. संजय राठोड यांच्यावरील एफआयआर अद्याप वा-यावरच आहे, बलात्का-यांना सोडविण्यासाठी मोठ्या नेत्यांचे फोन येतात, विनयभंग झालेल्या महिलेबाबत एक मंत्री संशयास्पद वक्तव्य करतात, सांगलीत विनयभंग झाल्यावर तक्रार द्यायला गेलेल्या महिलेलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करून पुरावे मागितले जातात. हे सारेच अनाकलनीय आहे, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई हे जगातील सुरक्षित शहर म्हणून टेंभा मिरविणा-या सत्ताधा-यांच्या डोळ्यावरील झापडे कधी उघडतील. चेंबूर, नवी मुंबई, ठाणे, सांगली, अमरावती येथे महिला अत्याचारांच्या घटनांनी थैमान घातले आहे. बाललैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी शासन यंत्रणा मात्र ढिम्म आहे. सत्तेतील तीन पक्ष रोज एकमेकांना जोड्याने हाणतात, कपडे फाडतात, आमचे ऐकले नाही तर गडबड होईल असे फुका इशारे देतात. दिवसभर एकमेकांविरोधात तावातावाने बोलणारे संध्याकाळी मात्र गळ्यात गळे घालून बसतात. आज एखादा बलात्कार झाला की, यांच्यादृष्टीने एकने आकडा वाढला एवढेच. राज्य सरकारला बाकी काहीही देणे घेणे उरलेले नाही, असे त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.