तात्या लांडगे
सोलापूर : मुलगा ३५, ४० वर्षांचा झाला पण विवाहासाठी मुलगीच मिळत नाही, अशी चिंता अनेकांना सतावू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या एक हजार मुलांमागे ९३१ मुली म्हणजे ६९ मुलींचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारे बालविवाह आणि अवैध गर्भपाताचा फटका मुलींच्या जन्मदरास बसला आहे. मंगळवेढा, माढा, उत्तर सोलापूर, सांगोला या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले.
सोलापूर जिल्ह्यात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात ३८ हजार आठ मुलांचा जन्म झाला, त्यात मुलांच्या तुलनेत साडेतीन हजार मुली कमी आहेत. तर १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात २२ हजार ३६४ मुलांचा जन्म झाला, त्यातही दोन हजार मुली कमीच आहेत. दरम्यान, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे प्रेमाच्या आमिषातून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींवरील अत्याचार, मुलीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, उच्चशिक्षणानंतरही नोकरीची खात्री नाही, अशा प्रमुख कारणांमुळे पालक मुलीचा विवाह लवकर लावतात.
दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारने मुलींसाठी ‘लेक लाडकी’, मुलींना उच्चशिक्षण मोफत, अशा अनेक योजना आणल्या. तरीदेखील, लिंगभेद आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी झालेले नाही, अशी वस्तुस्थिती आहे. मुलींना हमखास नोकरी, पुरेशी सुरक्षा, प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणीवर कठोर कायदा, अशा ठोस उपाययोजना केल्यास निश्चितपणे मुलींचा जन्मदर वाढेल, अशी खात्री अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बालविवाहात सोलापूर राज्यात चौथे
१ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात महिला व बालविकास विभागाच्या पथकांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २१६ बालविवाह रोखले आहेत. राज्यातील सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या जिल्ह्यात सोलापूर चौथ्या क्रमांकावर आहे. बालविवाहाचा कायदा मोडून मुलींचे १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह लावणाऱ्या २९ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. दक्षिण व उत्तर सोलापूर (सोलापूर शहरासह), माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट व बार्शी तालुक्यात सर्वाधिक बालविवाह होतात, असे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.
कोणीही करु नये मुलीचे बालविवाह, अन्यथा...
कायद्याने मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करता येत नाही. जिल्ह्यात कोठेही बालविवाह होत असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. बालविवाहानंतर मुलीच्या खांद्यावर संसार पडतो, लवकरच मातृत्व आल्याने तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. सासरी छळ सुरु होतो. पालकांनी मुलींचे आयुष्य बरबाद होऊ नये, यासाठी तिला शिक्षणातून स्वावलंबी करावे. जेणेकरून, तिला कोणताही त्रास होणार नाही, तिचे आरोग्यही उत्तम राहील.
- वैशाली भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
तालुकानिहाय मुलींचा जन्मदर
तालुका मुलींचा जन्मदर तफावत
मंगळवेढा ९१२ ८८
माढा ९१४ ८६
उ. सोलापूर ९२२ ७२
मोहोळ ९२९ ७१
सांगोला ९३१ ६९
द. सोलापूर ९३८ ६२
बार्शी ९४१ ५९
अक्कलकोट ९४१ ५९
करमाळा ९४३ ५७
माळशिरस ९४२ ५८
पंढरपूर ९४६ ५४
एकूण ९३१ ६९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.