तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९६९ मध्ये औज बंधाऱ्यावरून टाकळी योजना कार्यान्वित झाली. पुढे १९८० मध्ये उजनी धरण पूर्ण झाल्यावर भीमा नदीद्वारे टाकळी तथा औज बंधाऱ्यात पाणी सोडून सोलापूरकरांची तहान भागविली जाऊ लागली. पण, आता १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी टाकल्याने औज बंधारा कोरडाठाक पडला, तरीदेखील सोलापूरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.
पावसाळ्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच मकर संक्रातीवेळी दरवर्षी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडावे लागायचे. त्यामुळे फेब्रुवारीतच उजनीची पातळी ८५ टक्क्यांपर्यंत येत होती. मात्र, ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच सोलापूर महापालिकेने औज बंधारा कोरडाठाक पडूनही उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केलेली नाही. त्यामुळे सध्या उजनी धरण ९८ टक्के भरलेले आहे.
दरम्यान, औज बंधाऱ्यात पाणी असताना तेथून दररोज २५ एमएलडी आणि समांतर जलवाहिनीतून १५० एमएलडी पाणी घेतले जात होते. मात्र, आता औज बंधाऱ्यात पाणी नसल्याने उजनीवरील समांतर जलवाहिनीतून व जुन्या पाईपलाइनमधून पाणी घेतले जात आहे. समांतर जलवाहिनीचे तीन आणि जुन्या पाइपलाइनचे दोन पंप सध्या सुरू आहेत. आगामी काळात सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा देण्यासंदर्भातील नियोजन महापालिकेकडून सध्या सुरू आहे.
कंत्राटदार करणार पाणीपट्टी वसुली!
सोलापूर शहराला दररोज पाणी देण्यासाठी सुमारे १३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारच्या माध्यमातून जागतिक बॅंकेकडून ६०० कोटी मिळतील. महापालिका रोख्यातून (बॉण्ड) २०० कोटी उभारणार आहे. उर्वरित ५०० कोटी रुपये खासगी कंत्राटदार तथा कंपनीकडून घेतले जाणार आहेत. त्या बदल्यात पाणीपट्टी वसुलीचा अधिकार त्या कंपनीला दिला जाईल. कंपनीने दरमहा पाणीपुरवठा चालविण्याचा खर्च व मुद्दलाचा हप्ता घेऊन राहिलेली रक्कम महापालिकेला द्यावी, असे धोरण ठरविले जात आहे. जागतिक स्तरावरील तीन कंपन्यांशी बोलणी सुरू असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.