Ladki Bahin Yojana
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातील ११ लाख २० हजार ५६३ महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. प्रत्येक महिलेला १ जुलै २०२४ पासून लाभ मिळाला. आता ज्या महिलांनी ‘ई-केवायसी’ केली नाही किंवा ‘ई-केवायसी’तील चूक दुरुस्त केली नाही, त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. एप्रिलमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांचे एकदम ४५०० रुपये मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चारचाकी वाहने, सरकारी नोकरदार किंवा पुरुष लाभार्थी, कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त, केंद्र किंवा राज्याच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेतील लाभार्थी अशा सर्वांची नावे योजनेतून काढून टाकण्यात आली आहेत. याशिवाय मृत किंवा वयोमर्यादा संपुष्टात आलेल्यांचीही नावे वगळली आहेत. लाडकी बहीण योजनेतील सर्वांनी नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांत ‘ई-केवायसी’ करण्याचे आदेश दिले होते. तरीही सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः एक लाख, तर राज्यातील २० लाखांहून अधिक महिलांनी ‘ई-केवायसी’ केली नाही.
दुसरीकडे, ई-केवायसी करूनही त्यात चुका झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या देखील मोठी होती. या पार्श्वभूमीवर चुकीच्या दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली; पण ज्यांची ई-केवायसी राहिली आहे, त्यांना कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही.
‘ई-केवायसी’तील चूक दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार प्रत्येक लाभार्थीची पडताळणी झाली आहे. आता ज्या महिलांकडून ‘ई-केवायसी’त चूक झाली, त्याची दुरुस्ती ३१ मार्चपर्यंत केली जात आहे. पण ज्यांनी ‘ई-केवायसी’ केलीच नाही, त्यांना मुदतीनंतर संधी मिळालेली नाही. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एप्रिलमध्ये प्रलंबित लाभाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल.
- विजय खोमणे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर
एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्याच खऱ्या लाडक्या बहिणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनाच मिळेल असा निकष आहे. तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनेसाठी अर्ज करून लाखो अपात्र महिलांनी लाभ घेतला. आता ‘ई-केवायसी’तून उत्पन्नाची माहिती समोर येणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये ज्या महिलांना लाभ मिळेल, त्याच योजनेतील खऱ्या लाडक्या बहिणी तथा लाभार्थी असणार आहेत. ज्यांना लाभ मिळणार नाही, त्यांचा लाभ कायमचा बंद झाला असे समजावे लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.