तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील आठ, तर दक्षिण सोलापूर, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील सात अशा एकूण १५ खासगी इंग्लिश मीडियम शाळा शासनाच्या मान्यतेविना सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या शाळांनी मान्यता मिळण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षण सुरू केले आहे. या शाळांवर कारवाई करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल ११ वेळा गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकाऱ्यांना पत्रे पाठविली; मात्र प्रत्यक्षात कारवाई अद्यापही झालेली नाही.
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जुलै २०२५ मध्ये प्रथमच या शाळांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर वेळोवेळी आणखी दहा पत्रांद्वारे त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. मात्र, संबंधित शाळा आजही सुरू असून त्यांना शासनाची मान्यता मिळालेली नाही. कारवाईसाठी अधिकारी भेट दिल्यानंतर संबंधित शाळांकडून ‘मान्यतेची फाईल सचिव, शिक्षण संचालक किंवा आयुक्तांकडे प्रलंबित असून लवकरच मान्यता मिळणार आहे,’ असे सांगितले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी सांगितले, ‘शहरातील काही विनामान्यता शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
काही संस्थांकडून एक लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. उर्वरित शाळांना नोटिसा बजावून पुढील कारवाई सुरू आहे.’ दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, ‘शहरातील खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांवर कारवाईची जबाबदारी महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांची, ग्रामीण भागातील शाळांबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांची, तर इयत्ता पहिली ते नववी किंवा पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची आहे.’ मान्यता नसलेल्या शाळांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या १५ शाळांचा सद्यःस्थिती अहवाल मागविला
सोलापूर शहर : नोबल विस्डम प्री-प्रायमरी स्कूल (बारा इमाम चौक), ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल (चंद्रलोक नगर, जुळे सोलापूर), नारायण ई-टेक्नो स्कूल, विष्णूपंत कोठे मेमोरिअल इंग्लिश मीडियम स्कूल, इकरा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब स्कूल (लोकमान्य नगर), श्री चैतन्य टेक्नो स्कूल (अंत्रोळीकर नगर), आर्यन वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूल (बॉम्बे पार्क), सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल (नई जिंदगी, कुंभारी रोड)
सांगोला : फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल (कटफळ), सांगोला गुरुकुल, बाळूमामा गुरुकुल, विश्वशोभा पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यालय, मेडशिंगी
दक्षिण सोलापूर : एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल (वळसंग), नागेश करजगी ऑर्किड स्कूल (कंदलगाव)
पंढरपूर : फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल
शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत बसविले जातील
शासनाच्या मान्यतेशिवाय सुरू असलेल्या शहर व जिल्ह्यातील १५ खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या सद्यःस्थितीचा अहवाल मागविला आहे. यापूर्वी पाठविलेल्या १० पत्रांच्या अनुषंगाने प्रशासनाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली, याची माहितीही मागविण्यात आली आहे. मान्यता नसतानाही प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य मान्यताप्राप्त शाळांमध्ये केले जाईल.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.