Dussehra Melava: दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्याच्या जागेवरुन मोठी राजकीय लढाई झाली होती. शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे आता दोन दसरा मेळावे होतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे दोघांसाठी दसरा मेळावा महत्वाचा आहे. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील मेळाव्याच्या जागेवरुन राजकारण होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून दसरा मेळावासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला. त्यामुळे शिंदे गट देखील सतर्क झाला असून त्यांनी जागांचा शोध सुरु केला आहे.
मागच्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंना शिवाजी पार्कवर परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाने बीकेसीत दसरा मेळावा घेतला होता. मात्र आता बीकेसीत आजूबाजूला विकास काम सुरू आहेत. त्यामुळे बीकेसीत मेळावा घेणं शक्य नसल्यामुळे शिंदे गट महालक्ष्मी रेसकोर्सवर दसरा मेळावा घेण्याच्या विचारात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
असे म्हणतात दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे वर्षभराच्या राजकारणाची रुपरेषा ठरवायचे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. निवडणूक आयोगाने देखील शिंदेच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे आपली बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेचा पहिला मेळावा दसऱ्याच्या दिवशी होणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी पक्ष स्थापनेच्या वेळी केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या घोषणेनुसार दादरच्या शिवाजी पार्कवर 30 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मेळावा झाला होता.
1966 पासून दरवर्षी दसरा मेळावा होत आहे. आत्तापर्यंत असे दोनच प्रसंग आले आहेत जेव्हा ही रॅली झाली नाही. 2006 मध्ये पहिल्यांदाच मुसळधार पावसामुळे मुंबईत रॅली होऊ शकली नाही. तसेच, 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे मेळावा आयोजित करण्यात आला नव्हता. 2014 मध्ये शिवसेनेने शिवाजी पार्कवर पारंपरिक दसरा पूजा केली. त्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. त्यानंतर बोरिवलीत दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यंदाच्या सभेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे दोन गटात विभाजन. दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहे. दोन्ही गटांकडून रॅलीची तयारी जोरात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.