solapur excise department action
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : हातभट्ट्यांवर गावठी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी सुरू केली आहे. २९ मे ते १ जून या चार दिवसांत ५० हजार ४०० लिटर रसायन, चार हजार लिटर हातभट्टी, १५५ लिटर देशी-विदेशी दारू व ताडी जप्त करण्यात आली आहे. यात ४७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन वाहनेही जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. सोमवारी (ता. १) देखील हातभट्ट्यांवर छापेमारी सुरू होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत पोलिस प्रशासनाची मदत घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्ट्यांच्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. पुण्यात विषारी दारू प्राशन केल्याने २४ जणांचा मृत्यू झाला असून, असा प्रकार सोलापुरात होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. विषारी दारूमुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे, अकाली मृत्यू येणे असे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारचे मद्य प्राशन करू नये, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.
५ महिन्यांत ५७ लाखांची हातभट्टी नष्ट
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ जानेवारी ते ३१ मे २०२६ या कालावधीत हातभट्टी निर्मिती-विक्री करणाऱ्यांसह अवैध मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्या १,२९७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यात १,२५४ जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत ५७.३३ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, त्यात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीचा समावेश आहे. गतवर्षी याच पाच महिन्यांत हातभट्टी निर्मिती व विक्री करणाऱ्यांसह इतरांवर १,१९७ गुन्हे दाखल करून १,१०१ जणांना अटक करण्यात आली होती. गतवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत झालेल्या कारवाईत ३३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
नागरिकांनी माहिती द्यावी, नाव राहील गोपनीय
आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्यनिर्मिती किंवा विक्री होत असेल अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यांसारख्या पदार्थांची किंवा द्रव्यांची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास १८००२३३९९९९ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही माहिती पाठवता येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते.
- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.