सोलापूर : सोलापूर शहरातील बहुतेक घरांवरून किंवा घराजवळून गेलेल्या विजेच्या तारा उघड्याच आहेत. त्यामुळे वादळात अनेकांच्या घरात करंट उतरून काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. कोटेड कंडक्टर व एबी केबल हा त्यावरील पर्याय आहे, पण त्यासाठी ना जिल्हा नियोजन समितीकडून ना केंद्र-राज्याच्या योजनेतून पुरेसा निधी मिळतो. त्यामुळे घरांवरून गेलेल्या त्या उघड्या तारा मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. बुधवारी (ता. ९) महावितरणने झाडांच्या गराड्यात अडकलेल्या तारा मोकळ्या केल्या आहेत.
सोलापुरात २२० झोपडपट्ट्या असून, शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक याच भागात राहतात. प्रत्येकाच्या घरात वीज कनेक्शन आहे. अनेकांची घरे पत्र्याची असून, एकमेकांच्या घरांवरून विजेच्या वायर गेल्या आहेत. काहींनी घरांचे बांधकाम पुन्हा केल्याने काही फुटांवरच विजेच्या तारा आल्या आहेत. कुटुंबांची संख्या वाढल्याने अनेक ट्रान्सफॉर्मर आता लोकवस्तीत आले आहेत. एकाच कनेक्शनवर अनेकांना नवीन कनेक्शन दिल्याने शॉर्टसर्किट होऊन घरांमध्ये करंट उतरण्याचे प्रकार वाढले आहेत. कोनापुरे चाळीतील राजनंदिनी कांबळे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनचा मृत्यू देखील अशाच प्रकारातून झाला आहे.
भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेषत: शहरातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीतून उपाययोजनांसाठी महावितरणला पुरेसा निधी द्यावा, शासनाकडून ‘आरडीएसएस’तून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या दरवर्षी शहरातून चार-पाच ट्रान्सफॉर्मर इतरत्र हलवावा, अशा मागण्या येतात, पण निधीअभावी काहीच कार्यवाही होत नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
शहरातील महावितरणचा पसारा
एकूण कनेक्शन
२.३२ लाख
एकूण ट्रान्सफॉर्मर
२१८७
विभागीय कार्यालये
५
शाखा कार्यालये
२३
दरमहा विजेची मागणी
५५ दशलक्ष युनिट
प्रस्ताव मंजूर झाल्यावर निघेल कायमचा तोडगा
केंद्राच्या ‘आरडीएसएस’ योजनेतून सोलापूर शहरातील १५० किमी ‘एलटी’ लाइनवर एबी केबल टाकली जाणार आहे. याशिवाय ११ केव्ही लाईन असलेल्या ५० किमी अंतरावर कोटेड कंडक्टर टाकण्याचे प्रस्तावित आहे. जेणेकरून करंट लागणे, वादळ-वारे किंवा पावसात वीज स्पार्क होण्याचे प्रकार थांबतील. सोलापूर शहरातील विजेची कामे करण्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव असून तो मंजूर झाल्यावर ही कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.
- आशिष मेहता, कार्यकारी अभियंता, सोलापूर शहर
बांधकाम करताना नियम पाळला जातोय का?
घराचे बांधकाम करताना महापालिकेकडून परवाना दिला जातो. त्यावेळी विजेच्या कनेक्शनपासून (एलटी लाईन) उभे १८ फूट तर आडवे एक मीटर अंतर सोडण्याचे बंधन घातले जाते. याशिवाय जो सुरवातीला त्याचाच पहिला अधिकार, असा कायदा सांगतो. त्यामुळे अगोदरपासूनच विजेची लाईन गेली असल्यास घराचे बांधकाम करताना जागा मालकास त्या नियमांचे पालन करून बांधकाम करावे लागते. पण, शहरातील सद्य:स्थिती पाहता कोणत्याही नियमांचे पालन दिसत नाही.
------------------------------------------------------------------------------------
नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर करावी तक्रार
नागरिकांसाठी महावितरणने दैनंदिन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तक्रारीसाठी ९०२९१४०४५५ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्यावर नागरिकांनी दैनंदिन समस्येचा फोटो, स्वत:चे नाव, लोकेशन (परिसर) नमूद करून तक्रार करणे अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.